वर्धा शहरालगतच्या गावांचा पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करा – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका): वर्धा शहरालगतच्या पिंपरी मेघे व १३ गावांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. तसेच अनेक कुटुंबांना नळ जोडण्या देण्यात आल्या नाहीत. या गावांच्या पाणीपुरवठ्यातील अडचणी दूर करून नियमित पाणी उपलब्ध करून द्या, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी शहरालगतच्या गावांना सुरळीत पाणीपुरवठा, वर्धा शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना व वीज वितरण कंपनीच्या विविध विषयांचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले.

यावेळी जिल्हाधिकारी वानमथी सी., माजी खासदार रामदास तडस, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बुरडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, उप अभियंता महेश मोकलकर, वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता स्मिता पारखी, अधिकारी तसेच लगतच्या गावांचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

शहरालगतच्या गावांना सहा, सात दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे सरपंच, सचिवांना गावकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागते. त्यामुळे गावांना पाणी पुरवठा नियमित होणे आवश्यक असल्याची बाब सरपंचांनी बैठकीत मांडली. त्यानंतर पुरवठ्यातील अडचणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीकडून जाणून घेतल्या. नागरिकांना पाणी पुरविणे शासनाचा अतिशय प्राधान्याचा विषय आहे. त्यामुळे पुरवठ्यातील अडचणी दूर करून सुरळीत पुरवठा करावा, असे पालकमंत्र्यांनी जीवन प्राधिकरण व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

वर्धा शहराची पाणी पुरवठा योजना जुनी आहे. त्यामुळे पाईपलाईन लिकेजेस, वारंवार वीज पुरवठा खंडीत होणे, या समस्या निकाली काढण्यात याव्या. शहर व लगतच्या गावांसाटी वाढीव पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येत असून, त्याचे सादरीकरण यावेळी कार्यकारी अभियंता श्री. बुरडे यांनी केले. वाढीव योजना करताना भविष्यातील लोकसंख्या, नळ जोडणी, पाणी वितरण व साठवणूक व्यवस्थेचा परिपूर्ण विचार करण्यात यावा, असे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले. वरुड गावाला सेवाग्राम योजनेतून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *