आरक्षण बचावासाठी एकजुटीने सहभागी झाले मान्यवर
प्रतिनिधी/ दै. प्रतापगडचे वार
वर्धा : अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात आज विविध संघटना व पक्षाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. आज १२.३० वाजता बजाज चौक येथून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली. शहराच्या प्रमुख मार्गाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धडकला. भंतेराजरत्न विशाल मानकर, अनिल जवादे, डॉ. विद्याताई राईकवार किशोर खैरकार, विशाल रामटेके, आशिष सोनटक्के, सुनिल ढाले सह विविध क्षेत्रातील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाच्या आयोजकांनी उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत हा निर्णय कोणत्याही सर्वसमावेशक व वैज्ञानिक आधाराशिवाय घेतल्याचा आरोप केला आहे. ‘अनुसूचित जाती हा एकसंघ घटक राहावा, ही संविधानाची भूमिका असून उपवर्गीकरण सामाजिक ऐक्याला बाधा पोहोचवणारे आहे,’ असे आयोजकांचे मत आहे.
आंदोलनकर्त्यांनी मांडलेल्या प्रमुख आक्षेपामध्ये कोणत्याही सार्वजनिक व वैज्ञानिक इम्पेरिकल डेटा उपलब्ध नसणे, समितीत सर्व घटकांचे प्रतिनिधित्व नसणे, तसेच समितीचा अहवाल अद्याप जाहीर न करणे यांचा समावेश आहे. ‘अहवाल सार्वजनिक न करताच निर्णय घेण्यात आला, त्यामुळे तो कोणत्या निकषांवर आधारित आहे याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत,’ असे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.
याशिवाय उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येच्या आधारे आरक्षणाचे विभाजन होऊन काही समाजघटकांनाच अधिक लाभ मिळण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे. बौद्ध धम्म आणि भारतीय संविधान समानता, बंधुता व सामाजिक न्याय यांची शिकवण देतात. त्यामुळे समाजात फूट पाडणाऱ्या कोणत्याही निर्णयाला विरोध करण्यात येईल, अशी भूमिका आयोजकांनी स्पष्ट केली.
‘उपवर्गीकरण हटाव, आरक्षण बचाव’, ‘संविधान वाचवा’, ‘समानता वाचवा’ अशा घोषणांसह मोठ्या संख्येने समाजबांधव मोर्चामध्ये सहभागी झाले होते. शासन हा निर्णय रद्द केला नाही तर राज्य भर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.