गृह राज्यमंत्री तथा वर्धा व भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेण्याचा उपक्रम संपूर्ण राज्यात सुरू केला आहे. या उपक्रमाची सर्वत्र स्तुती होत असताना आता त्यांनी पोलिस अधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटलांच्या पाल्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री अल्पकालीन अभ्यासक्रम योजनेमध्ये त्यांचा समावेश करण्याची मागणी केली होती. सदर योजना कौशल्य विकास विभागाच्यावतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत चालविण्यात येत आहे. या योजनेत पोलिस अधिकारी, कर्मचारी व पोलिस पाटलांच्या पाल्यांचा समावेश करून त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिल्यास त्यांची व्याप्ती वाढेल व स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन मिळेल यासाठी पुढाकार घेतला होता.