वर्धा (जिमाका) : रोजगार ही एक मोठी समस्या आहे. लोकसंख्या वाढीनुसार रोजगार सुद्धा वाढविणे गरजेचे असून त्यावर ठोस मार्ग काढणे आवश्यक आहे. उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी शासकीय आयटीआय, तंत्रनिकेतन येथे परंपरागत अभ्यासक्रमासोबतच नवीन तंत्रज्ञानावर आधारित रोजगारक्षम अभ्यासक्रमावर भर द्या, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे अल्पकालीन अभ्यासक्रम व मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेचा आढावा त्यांनी घेतला, त्यावेळ ते बोलत होते. पालकमंत्र डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वानमथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी परागश्रम, व्यवसाय व प्रशिक्षण नागपूर विभागाचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, कौशल्य विकास नागपूर विभागाचे उपायुक्त प्रकाश देशमाने, सहाय्यक आयुक्त नीता औधड, जिल्हा समन्वयक सागर आंबेकर, शासकीय आयटीआयचे प्राचार्य, उद्योजक आदी उपस्थित होते.
श्री. लोढा पुढे म्हणाले की, रोजगाराच्या संधी वाढविण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही उद्योग क्षेत्रात काम करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते.
कुशल मनुष्यबळ तयार करून स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शॉर्ट टर्म व न्यू एज अभ्यासक्रम सुरु करण्यात आले असून त्याबाबतची जनजागृती करावी. स्वयंरोजगारावर अभ्यासक्रमावर भर देऊन शॉर्ट टर्म अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करा, असे ते म्हणाले. ग्रामीण भागांमध्ये अल्पकालीन अभ्यासक्रमाची माहिती पोहचविण्यासाठी नियोजन करा. तांत्रिक बाबींसोबतच व्यवस्थापन अभ्यासक्रम सुद्धा शिकविण्यावर भर द्या. आगामी काळात आयटीआयमध्ये इ नोव्हीशन सेंटर सुरु करणार असून इतरही अभ्यासक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.