हजार रुपयांच्या लाचप्रकरणी दोघांवर कारवाई; कृषि पर्यवेक्षकासह एक जण एसीबीच्या जाळ्यात

हिंगणघाट : चापकाटर मशिनची जास्त सबसिडी मिळवून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कृषि पर्यवेक्षकासह एकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई करण्यात आली. ही कारवाई हिंगणघाट येथे करण्यात आली. कारवाई केलेल्यांची नावे बाबाराव उत्तमराव नाईक (वय ४७) कृषी पर्यवेक्षक कृषी मंडळ अधिकारी कार्यालय हिंगणघाट, रा. समतानगर, सावंगी (मेघे), संकेत घनश्याम विटाळे (वय २५) रा. सावली (वाघ) ता. हिंगणघाट अशी आहेत. तक्रारदाराने राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत चापकाटर मशिन खरेदी केली होती.

मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक बाबाराव उत्तमराव नाईक चापकाटर मशिनची पाहणी करण्याकरीता गेले होते. त्यावेळी त्यांनी तक्रारदारास चाप कटर मशिनवर जास्तीत जास्त सबसिडी मिळवून देण्यासाठी पैशाची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याबाबत तक्रार केली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली आणि १२ नोव्हेंबर रोजी सापळा कार्यवाही करण्यात आली. त्यावेळी बाबाराव उत्तमराव नाईक हे हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात मिळून आले.

संकेत घनश्याम विटाळे रा. सावली (वाघ) यास नाईक यांनी तक्रारदाराकडून ऑनलाईन पद्धतीने लाच रक्कम स्वीकारण्यासाठी तक्रारदाराचे व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज केला. याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक माधुरी बावीसकर, पोलिस उपअधीक्षक राकेश साखरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संदीप मुपडे, कान्होपात्रा बन्सा, सहायक फौजदार मंगेश गधे, पंकज डाहाके, मंगेश झावरे, सचिन गाडवे, राखी फुलमाळी, प्रितम इंगळे, प्रशांत मानमोडे, मनिष मसराम, विनोद भोगडे, लक्ष्मण केंद्रे, गणेश पवार, विष्णु काळुसे, अश्विनी भानखेडे, गणेश मसराम यांनी केली. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *