निर्घृण हत्येतील आरोपींना तात्काळ अटक करून फाशीच्या शिक्षेची मागणी

देवळी पोलिस ठाण्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे देवळी : देवळी तालुक्यातील अंदोरी (आंजी) येथील रविंद्र अशोक पारीसे (वय ५०) यांची दि. २० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता वर्धा नदी पलीकडील चिंचोली (सावरगाव), ता. कळंब, जि. यवतमाळ येथील आय. बी. ढाब्यावर निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून, समाजाच्या वतीने आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भात महर्षी वाल्मिकी भोई समाज, विदर्भ भोई समाज संघटना, पत्रकार संघ, सर्व पक्षीय कार्यकर्ते, नागरिक आणि विविध सामाजिक संघटना यांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून निवेदन सादर केले. हे निवेदन देवळी पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अश्वीन गजभिये, कमलेश मगरे यांच्यामार्फत सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, घटनेनंतर इतका कालावधी उलटूनही आरोपी फरार आहेत.आणि अजून ठोस कारवाई झालेली नाही.

या निंदनीय घटनेमुळे समाजामध्ये तीव्र रोष असून, कायदा- सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी समाजाच्या वतीने निवेदनातून मागण्या करण्यात आल्या :
सर्व आरोपींना तात्काळ शोधून अटक करावी. हत्याकांडातील आरोपींना कायद्यानुसार कठोरात कठोर व फाशीचीच शिक्षा द्यावी.

मृतकाच्या कुटुंबीयांना त्वरित सरकारी संरक्षण व आर्थिक मदत द्यावी. अंदोरी परिसरात पोलीस गस्त व सुरक्षा व्यवस्था वाढवावी.
प्रकरणाचा जलदगती न्यायालयात पाठपुरावा करावा.
प्रकरणात टाळाटाळ किंवा राजकीय दबाव आढळल्यास राज्यव्यापी आंदोलन करन्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

या घटनेने संपूर्ण देवळी तालुका आणि भोई समाजात संतापाची लाट उसळली असून, राज्य शासनाने तात्काळ व निर्णायक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी पुष्पा करलुके, किरण पारीसे, रविद्र पारीसे, ओम मडावी, हनुमंत मांढरे, पवन बावने, तनय ढोले, मोहन सिडाम, शंकर केवदे, निलेश झामरे, सचिन पारीसे, गजानन अंबूलकर, मंथन पारीसे, सागर पारीसे, निरंजन शिवरकर, प्रशिल साठवनकर इत्यादी नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *