शेतीपूरक व्यवसायाकरिता कुशल कामगार मिळणार

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : आजच्या काळात व्यावसायिक प्रगतीकरिता कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. याच संकल्पनेतून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यशवंतराव चव्हान मुक्त विद्यापिठाचे कौशल्य विकास केंद्र जिल्ह्यात आणण्याकरिता पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून विद्यापिठाकरीता १० एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. सोबतच या केंद्राचे करण्याकरिता आवश्यक असलेल्या वास्तुंची उपलब्धता तसेच पहिल्या व कामकाज टप्प्यातील दुसऱ्या बांधकामाकरिता १८५ कोटी रुपये देण्यात येणार आहे.

या केंद्रात केवळ जिल्हातील नव्हे तर विदर्भात असलेल्या विविध रोजगाराकरिता कुशल हात निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. राज्याचे गृह (ग्रामीण), प्राथमिक शिक्षण, सहकार, खनिकर्म आणि गृहनिर्माण राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वर्ध्यात कुशल कामगार निर्माण व्हावे याकरिता कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा प्रस्ताव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याकडे सादर केला होता.

त्याला मुक्त विद्यापीठाकडून हिरवी झेंडी देण्यात आली आहे. या व्यवसाय कौशल्य केंद्रला मान्यता देताना विद्यापीठाच्या कुलगुरुंनी वर्धा जिल्हा व एकूण विदर्भाचा शैक्षणिक अनुशेष भरून काढण्याकरिता हे केंद्र कार्यरत राहणार असल्याचे म्हटले आहे. वर्धा येथील विद्यापीठाला प्राप्त जागेवर खालीलप्रमाणे सविस्तर असे शैक्षणिक संकुल उभे करणे हा विद्यापीठाचा मुख्य हेतु आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठ स्वनिधीतून भांडवली खर्च करणार आहे. तसेच शासनाच्या आर्थिक मदतीने सदर शैक्षणिक संकुल पुर्णत्वास नेण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. त्याहेतुने प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

सदर संकुल व व्यावसायिक कौशल्य विकास केंद्र महाराष्ट्रात उच्च दर्जाचे शिक्षण देणारे एक अग्रगण्य परिसर ठरणार आहे. वर्धा जिल्हा हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेला जिल्हा आहे. महात्मा गांधी यांचे शहराकडून खेड्याकडे चला हे स्वप्न पुर्णत्वास नेण्याकरिता या विदर्भाचा जाणीवपूर्वक शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास होणे हे अगत्याचे आहे. वर्धा जिल्हा या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच विभागीय कार्यालय आणि निवासी व अनिवासी व्यावसायीक कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहे. या भागात असणाऱ्या शेती आणि शेतीपूरक इतर लघु उद्योगांना पुरेशा प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकजा भोयर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *