उमेदवारांना सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक जाहिरातीचे प्रमाणीकरण करणे आवश्यक

(अजीज शेख) प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : जिल्ह्यातील ६ नगरपरिषदांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या निवडणुकीत सर्व उमेदवारांना प्रचाराच्या सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या जाहिराती प्रसारणापूर्वी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाण व सनियंत्रण समितीच्या माध्यमातून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. प्रमाणीकरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाण व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या दि. ९ ऑक्टोबर २०१५ च्या राजपत्रांन्वये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे प्रसारित, प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक विषयक प्रस्तावित जाहिरातींचे प्रसारमाध्यम प्रमाण व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणन करून घेणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये दूरदर्शन, उपग्रह वाहिन्या, केबल वाहिन्या, यू-ट्यूब वाहिन्या, केबल नेटवर्क, आकाशवाणी, खासगी एफएम वाहिन्या, चित्रपटगृहे, बल्क एसएमएस, व्हाइस एसएमएस, संकेतस्थळे, सोशल मीडिया आदींचा समावेश होतो.जिल्ह्यात वर्धा, हिंगणघाट, आर्वी, देवळी, पुलगाव, सिंदी रेल्वे या नगरपरिषदेसाठी सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

दि. २ डिसेंबरला मतदान होणार असून दि. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. जिल्हाधिकारी वानमथी सी यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय माध्यम प्रमाण व सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. सर्व इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी प्रस्तावित जाहिरातींचे पूर्वप्रमाणन, पेडन्यूज संदर्भातील तक्रारी, प्रकरणांची चौकशी, त्यांचे निराकरण, देखरेख आदी कामे समिती करेल. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाण व सनियंत्रण समितीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, उपजिल्हाधिकारी संजीव जाधव, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, संबंधित नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच सदस्य सचिव म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड यांचा समावेश आहे.

प्रस्तावित जाहिरात प्रसारित, प्रसिद्ध करण्याच्या दिनांकापूर्वी किमान पाच दिवस आधी समितीकडे जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा येथे पूर्व प्रमाणनासाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत जाहिरातीची इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील प्रत, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने किंवा उमेदवाराने साक्षांकित केलेल्या संहितांच्या दोन मुद्रीत प्रती जोडणे आवश्यक आहे, असे समितीचे सदस्य सचिव मंगेश वरकड यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *