ईंद हा सण प्रेम, त्याग आणि एकतेचे प्रतीक : माजी आमदार प्रा. राजू तिमांडे

हिंगणघाट : पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने ईदगा येथे मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात नागरिकांशी भेटीगाठींचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी दरवर्षीप्रमाणे माजी आमदार प्रा. राजू तिमांडे व ॲड. सुधीर कोठारी यांनी परिसरातील मुस्लिम बांधवांना प्रत्यक्ष भेटून ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या उपक्रमामुळे परिसरात बंधुभाव आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमादरम्यान माजी आमदार प्रा. राजू तिमांडे व ॲड. कोठारी यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली. त्यांनी प्रत्येकाशी हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मान राखत त्यांचे आशीर्वादही घेतले. ‘ईद हा सण प्रेम, त्याग आणि एकतेचे प्रतीक आहे. समाजात शांतता आणि परस्पर सन्मान टिकवून ठेवण्यासाठी अशा सणांचे विशेष महत्त्व आहे.’

ईदगाह परिसरातील विविध भागांतून मोठ्या संख्येने नमाजदारांनी एकत्र येऊन ईदची नमाज अदा केली. पारंपारिक वेशभूषेत सजलेले मुस्लिम बांधव, तरुण, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी ईद निमित्त एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा केला. सर्वत्र आनंद, आपुलकी आणि सणाचा उत्साह पाहायला मिळत होता. एकमेकांना मिठ्या मारून, हस्तांदोलन करून आणि शुभेच्छा देऊन ईदचा आनंद सर्वांनी द्विगुणित केला.

तसेच पोलीस प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित होते. कार्यक्रम अधिक सुरळीत आणि कुठलेही गालबोट न लागता शांततेत पार पडला. सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था राखत सण साजरा करण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *