वर्धा (जिमाका) : जिल्ह्यातील सहा नगर परिषदेच्या अध्यक्ष व सदस्य पदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने मतदान केंद्र परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १४४ नुसार निर्बंध करण्यत आले आहे. सदर निर्बंध दि. १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता पासून दि. २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात लागू राहणार आहे.
निर्बंध कालावधीत बेकायदेशीर जमाव जमविण्यावर व सार्वजनिक प्रचार सभा आयोजीनवरावर बंदी राहील. मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळख चिठ्या साध्या पांढऱ्या कागदावर असाव्यात व त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा मुद्रीत करण्यावर बंदी राहील. मतदान केंद्राचे २०० मीटर परिसरात निवडणूक कर्तव्यावरील वाहन वगळता इतर सर्व वाहनांस बंदी राहील. मतदान केंद्रात मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक मतदान प्रतिनिधी यांच्या अतिरिक्त फर्क निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तींना प्रवेश राहील. मतदारांना लाच देणे, मतदारांवर दडपण आणणे, मतदारांना धाकदपटश दाखविणे, तोतयेगिरी करणे तसेच मतदान केंद्राचे २०० मीटर परिसरात प्रचार करण्यास बंदी राहील. मतदानाचे दिवशी मतदान केंद्राच्या २०० मीटर परिघामध्ये टॅक्सी, खाजगी कार, ट्रक, ऑटोरिक्शा, मिनी बस, स्टेशन व्हॅन, स्कूटर, मोटार सायकल इत्यादी सर्व वाहनास बंदी राहील.