धोरणात बदल केल्याने हजारो उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्त्या – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

वर्धा (जिमाका) : शासकीय सेवेतील एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर कुटुंबातील सदस्य अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळविण्यासाठी अनेक वर्ष वाट पाहावी लागत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धोरणात बदल केल्याने हजारो कुटुंबांना न्याय मिळाला. अनुकंपा तत्वावर नियुक्त्या देण्याची प्रक्रिया सोपी झाली, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अनुकंपा तत्वावरील उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळ, तहसिलदार अनिकेत सोनवणे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुंबई येथे तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. मुंबई येथून या कार्यक्रमाचे दृकश्राव्यप्रणालीद्वारे प्रसारण करण्यात आले होते. संपूर्ण राज्यभर आज १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आले. त्यात ५ हजार ५८७ अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यात अनुकंपा तत्वावरील गट ‘क’ ३०, गट ‘ड’ २५ तर लोकसेवा आयोगाद्वारे निवडलेल्या ३९ अशा १५४ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले.

अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया आधी खूप किचकट होती. नियुक्त्या देतांना विविध प्रकारच्या अडचणी येत होत्या. कुटुंबातील व्यक्ती अकाली गेल्याने त्या कुटुंबाचे दुःख काही प्रमाणात का होईना कमी करता आले पाहिजे, यासाठी धोरणात बदल करण्यात आले. त्यामुळेच आज एकाच दिवशी हजारो उमेदवारांना नियुक्त्या देता आल्या, असे पुढे बोलतांना पालकमंत्री म्हणाले.

वर्धा छोटा जिल्हा आहे. येथील प्रत्येक युवक नोकरीसाठी धडपडत असतो. नोकरीची संधी मिळावी पाहिजे अशी भावना असते. राज्य शासनाने नोकर भरतीचे चांगले धोरण आणल्याने हजारो युवकांना परिश्रमाच्या बळावर हक्काची शासकीय नोकरी उपलब्ध होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अनुकंपा नियुक्तीसाठी राज्य शासनाचे अतिशय चांगले धोरण आणले आहे. त्यामुळे तातडीने नियुक्त्या मिळून कुटुंबावरील संकट कमी होण्याचे प्रयत्न होत आहे. शासकीय नोकरीमुळे कुटुंबाला आधार मिळतो, असे सांगितले. पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी शासकीय नोकरी कुटुंबाचे जीवनमान सुरक्षित करणारी असते. उमेदवारांनी नोकरीत आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे कल्याण, समाधान कसे होईल यादृष्टीने काम करावे, असे सांगितले.

यावेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते अनुकंपा व लोकसेवा आयोगाद्वारे निवड झालेल्या काही उमेदवारांना आदेश देण्यात आले. त्यानंतर सर्वच उमेदवारांना आदेश देण्याची प्रक्रिया झाली. जिल्ह्यात अनुकंपा नियुक्ती देण्याची प्रक्रिया प्रशासनाने अतिशय आत्मियतेने व कालमर्यादेत राबविली. यावर आधारीत आणि उमेदवारांचे मनोगत असलेली चित्रफित यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन नायब तहसिलदार अतुल रसपायले यांनी केले. यावेळी नवनियुक्त उमेदवार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *