जिल्ह्यात २ ऑक्टोबर पर्यंत चालणार अभियान
वर्धा (जिल्हाका) : ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानां’तर्गत आयोजित महिला आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतर्गत दि. २२ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी २५९ शिबिरांत तब्बल ७ हजार ७३२ नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यामुळे ६ हजार ६३२ महिलांनी आपल्या संपूर्ण आरोग्याची तपासणी करून घेतली.
‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ हे केवळ आरोग्य तपासणीपुरते मर्यादित नाही तर ते महिलांना आरोग्यविषयक जागरूकता आणि शारीरिक व मानसिकरित्या सक्षम बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. ग्रामीण भागात मिळत असलेला चांगला प्रतिसाद उत्साहवर्धक असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना माध्यमांतून समाजामध्ये आरोग्य जागरूकता वाढवून महिलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यात येत आहे. अभियानामुळे नागरिकांना आरोग्य तपासणी करण्याची आणि वेळेवर उपचार घेण्याची संधी मिळत आहे. ज्यामुळे एक स्वस्थ नारी व सशक्त कुटुंब आणि सशक्त समाज निर्माण होण्यास मदत होते आहे. यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी अभियानाचा लाभ घेऊन शिबिरात उपस्थित राहून आपल्या आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील येले यांनी केले आहे.
दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारी सशक्त अभियानांतर्गत दिनांक २२ सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत आयोजित शिबिरातून एकूण २७ हजार २७२ नागरिकांनी लाभ घेतला असून यामध्ये १८ हजार ९६३ महिलांचा समावेश आहे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.