वर्धा (जिमाका) : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय जनता दरबार घेण्यात आला. जिल्हाभरातील नागरिकांनी या दरबाराला उपस्थित राहून आपले निवेदन, तक्रार, समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. जवळजवळ ३५० हून अधिक निवेदने पालकमंत्र्यांनी स्वीकारली. आलेल्या प्रत्येक नागरिकाशी आत्मियतेने संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व संबंधितांना त्यांच्या तक्रारींवर वेळेत कारवाई करण्याचे निर्देश दिले.
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या कालमर्यादेत निकाली निघाल्या पाहिजे. प्रशासनाकडे त्यांच्या प्रलंबित असलेल्या समस्या, प्रकरणांचा निपटारा गतीने व्हावा, यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याच संकल्पनेतून या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती मोरे, वर्धा नगरपरिषदेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता नोंदणीस सुरुवात झाली. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती. सभागृहासमोर मांडण्यात आलेल्या नोंदणी टेबलवरून प्रशासनाच्यावतीने प्रत्येकाला टोकन क्रमांक देण्यात आले. दुपारी २ वाजता जनता दरबारास सुरुवात झाल्यानंतर पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्वतः प्रत्येकाचे निवेदन स्वीकारले. त्यांचे म्हणणे, समस्या जाणून घेतल्या. आलेल्या प्रत्येकाशी आत्मियतेने संवाद साधला.
जनता दरबारास सर्व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. काही प्रकरणात तक्रारदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समोरासमोर चर्चा करून प्रकरण तातडीने निकाली काढण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. आपल्या समस्या, प्रश्न निकाली निघतील या अपेक्षेत जिल्हाभरातून नागरिक जनता दरबारात उपस्थित राहिले आहे. त्यामुळे त्यांच्या निवेदनांवर कालमर्यादेत कारवाई करा. जनता दरबारातील एकही प्रकरण प्रलंबित राहू नये, असे निर्देश सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले.