शेतकऱ्यांनी रक्कम जमा करूनही पालकमंत्री पांदण रस्ता योजनेची कामे अपूर्ण

कामे तात्काळ पूर्ण करण्याची खासदार अमर शरदराव काळे यांची प्रशासनाकडे मागणी
लोकवाहिनी न्यूज:वर्धा : जिल्ह्यात लोक सहभागातून शेत पांदण रस्ते मोकळे करून त्या पांदण रस्त्याची कामे करण्याची पालकमंत्री पांदण रस्ते योजना शासनाने जाहीर केली होती. या योजने अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे अतिक्रमित पांदण रस्ते मोकळे करून मातीकाम करण्याकरिता आवश्यक लोकसहभागाची रक्कम प्रशासनाकडे जमा करूनही बऱ्याच पांदण रस्त्याची कामे झाली नसल्याचे अनेक शेतकऱ्यांकडून खासदार अमर काळे यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारीची दखल घेऊन खासदार अमर काळे यांनी प्रशासनाला पत्र लिहून ज्या शेतकऱ्यांनी पालक मंत्री पांदण रस्ता योजने अंतर्गत लोक सहभागाची रक्कम भरलेली आहे ती पांदण रस्त्याची कामे तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी जिल्हाधिकारी, वर्धा यांच्याकडे केलेली आहे.

महाराष्ट्रात शेती हा प्रमुख व्यवसाय असून शेती वहीवाटीसाठी प्रत्येक शेताला पांदण मार्गाद्वारे वहीवाटीचा रस्ता महसूल विभागाद्वारे पूर्वीपासूनच देण्यात आला आहे. परंतु यावरून जसजसा काळ लोटत गेला त्यानुसार ३० ते ३५ फूट असलेले पांदण रस्ते शेतकऱ्यांनी संपूर्ण अतिक्रमण करून आपल्या शेतात समाविष्ट करून घेतले होते. त्यामुळे पांदण रस्ते अरुंद होऊन शेतकऱ्यांना वहीवाटीसाठी शेतात जाणे किंवा पिक निघाल्यानंतर निघालेले पिक बैलगाडीने घरी आणणे सुद्धा कठीण झाले होते. एक तर स्वतःच पांदण रस्त्यावर अतिक्रमण करून समोरील शेतकऱ्याचा शेत वहीवाट अडवणुकीचे प्रकार महाराष्ट्रात सरसकट आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांकडून वहीवाटीचा रस्ता मिळण्याबाबत महसूल विभागाकडे सतत तक्रारींचा ओघ वाढत होता. शासकीय जागेवर केलेले अतिक्रमण व शेतवहीवाटीचा बंद झालेला रस्ता, त्यावर येणाऱ्या तक्रारी या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने मातोश्री पांदण योजना आणली होती. या योजनेत महसूल विभागामार्फत पांदण रस्त्यावरील अतिक्रमण काढून मातीकामासाठी लागणारा जेसीबी करिता डिझेलचा खर्च शेतकऱ्यांनी करावा या धरतीवर पालकमंत्री पांदण रस्ता योजना जाहीर केली होती.

यात वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी लोक वर्गणी करून लोक सहभागातून पांदण रस्त्याची कामे करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे सन २०१७ मध्ये सादर केले होते. काही शेतकऱ्यांकडून खासदार अमर काळे यांच्याकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने लोकांनी लोकसहभागाची रक्कम भरून देखील प्रशासनाकडून पांदण रस्त्याची कामे करण्यात आली नाही. अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने खासदार अमर काळे यांनी याबाबत जिल्हाधिकारी, वर्धा यांना तात्काळ पत्र लिहून ज्या शेतकऱ्यांनी लोकसहभागाची रक्कम प्रशासनाकडे जमा केली आहे त्या शेतकऱ्यांच्या पांदण रस्त्याची कामे तात्काळ करावी असे निर्देश दिले. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी लोकसहभागाची रक्कम भरूनही पांदण रस्त्याची कामे झाली नाही अशा प्रकरणी खासदार अमर काळे यांनी दखल घेतल्याने या प्रकरणी काहीतरी मार्ग निघून ती कामे तात्काळ मार्गी लागतील अशी आशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *