प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत दुसऱ्या हप्ता तात्काळ वितरित करा

खासदार अमर शरदराव काळे यांची केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांचेकडे मागणी
प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत अनेक घरकुल धारकांना घरकुल मंजूर करण्यात आले व पहिल्या हप्त्याचे वितरण सुद्धा करण्यात आले. पहिल्या हप्त्याची रक्कम जमा झाल्याबरोबर घरकुल धारकांनी घरकुलाचे काम सुरु केले व काम तेवढ्यावरच न थांबवता दुसरा हप्ता मिळेल या आशेने व घर तातडीने पूर्ण व्हावे या हेतूने नातेवाईक किंवा इतर ओळखीच्या लोकांकडून उसनवारीने पैसे घेऊन आपल्या घरकुलाचे काम पूर्ण केले व घरकुल पूर्ण झाल्यानंतर अजूनपर्यंत त्यांना दुसऱ्या हप्त्याचे वितरण करण्यात आले नाही. शासन यंत्रणेकडे अधिक माहिती घेतली असता असे कळते की, या घरकुल धारकांचा वर्क कोड जनरेट न झाल्याने या लोकांना घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याच्या अनुदानाचे प्रस्तावच पाठविले गेले नाही.

घरकुल धारकांनी ज्या लोकांकडून उसनवारी तत्त्वावर पैसे घेतले होते त्या लोकांकडून पैसे परत करण्याबाबत सारखा तगादा सुरु झाला. उसनवारी पैसे परत करण्याविषयीची सतत मागणीमुळे व शासनाकडून अनुदान केव्हा मिळेल याची खात्री नसल्याने अनेक घरकुल धारक त्रस्त झाले व त्यांनी खासदार अमर काळे यांची भेट घेतली. खासदार अमर काळे यांनी याबाबत यंत्रणेकडे चौकशी केली असता अमरावती जिल्ह्यात जवळपास ३३०० व वर्धा जिल्ह्यात जवळपास ४०० ते ५०० या घरकुल धारकांचा वर्ककोड जनरेट न झाल्यामुळे दुसरा हप्ता वितरित करण्यात आला नाही. व वर्ककोड जनरेट झाल्याशिवाय हप्ता वितरित होणार नाही असे कळले.

घरकुल धारकांची बिघडलेली मानसिकतेची उसनवारीच्या पैशांविषयीचा तगादा व शासकीय यंत्रणांकडून मिळत असलेला नकारात्मक प्रतिसाद यामुळे त्रस्त झालेल्या घरकुल धारकांची परिस्थिती ओळखून खासदार अमर काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांना पत्र लिहिले व त्यात त्यांनी घरकुल धारकांची होत असलेली कुचंबणा लक्षात घेता वर्ककोड जनरेट करण्यातील अडचणी तात्काळ सोडवून घरकुल धारकांना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याचे वितरण तात्काळ करण्याबाबत विनंती केली. केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी सुद्धा या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता या अडचणींबाबत तात्काळ मार्ग काढून अनुदान वितरित करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन खासदार अमर काळे यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *