वर्धा : गौण खनिज वाळूचे उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करत पोलिसांनी ट्रॅक्टर, वाळूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सावंगी (मेघे) पोलिसांनी केली.सावंगी (मेघे) पोलिसांना डायल ११२ वर कुरहाडी शेतशिबारातील कुरहाडी नाल्यामधून वाळूचे अवैध रीत्या उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून कुरहाडी शेतशिबारातील नाल्याजवळ जाऊन पाहणी केली असता तेथे अवैध रीत्या वाळूचा उपसा करून वाळू ट्रॅक्टरमध्ये जमा करताना दिसून आले.
पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली, वाळूसाठा असा सात लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शेख अफसरोज शेख अब्दुल रा. सालोड (हिरापूर), ता. जि. वर्धा याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेसर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज बांबोडे, पोलीस हवालदार वीरेंद्र कांबळे, संजय पंचभाई, अनूप गोप नारायण, अनिल वैघ, निखिल फुटाणे, हर्षवर्धन मुन, अमोल जाधव यांनी केली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय पंचभाई करीत आहेत.