आमदार राजेश बकाने यांच्या पुढाकारामुळे सेवाग्राम रुग्णालयातील प्रशासन नमले

वर्धा : सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (MGIMS) मध्ये कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू केलेले उपोषण आमदार राजेश बकाने यांच्या निर्णायक पुढाकारामुळे अखेर ७ दिवसांनंतर मागे घेण्यात आले आहे. या उपोषण प्रक्रियेमध्ये कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे कर्मचारी उपोषणाला बसलेले होते ज्यामध्ये प्रामुख्याने सुमित पाटील, स्वप्निल वर्गने, शोएब खान, सारिका कांबळे, प्रतिभा देवतळे यांच्यासोबत एकूण नऊ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. या कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी, पदनामातील विसंगती व सेवा नियमितीकरणाच्या प्रश्नावरून निर्माण झालेला तिढा प्रशासनाने चर्चेद्वारे सोडविल्याने रुग्णालयातील आरोग्यसेवा पूर्ववत सुरू झाली आहे.

प्रयोगशाळा तंत्रज्ञांची नियुक्ती ही दिनांक ०३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावर करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी सलग दोन वर्षांचा परिवीक्षा कालावधी तसेच त्यानंतरची वाढीव मुदत यशस्वीरीत्या पूर्ण केली असतानाही, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी निर्गमित आदेशात त्यांना प्रयोगशाळा तंत्रज्ञ (कनिष्ठ) असे पदनाम देत कमी वेतनश्रेणी लागू करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.

या अन्यायकारक निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. उपोषणामुळे रुग्णालयातील तपासणी सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही गंभीर बाब लक्षात घेत आमदार राजेश बकाने यांनी तत्काळ हस्तक्षेप करत प्रशासन, कर्मचारी प्रतिनिधी व व्यवस्थापन यांच्यात मध्यस्थीची भूमिका घेतली.

आमदार बकाने यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या नियमसंगत व न्याय्य असल्याचे ठामपणे मांडत, आरोग्यसेवा ही सामान्य नागरिकांसाठी अत्यावश्यक असल्याने प्रश्न तातडीने सोडवावा, अशी भूमिका घेतली. त्यांच्या पुढाकारामुळे सेवाग्राम रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला. चर्चेनंतर प्रशासनाकडून नियुक्ती आदेशात दुरुस्ती काढण्याचे, दिनांक ०१ जानेवारी २०२६ पासून दरमहा रुपये ३४,०००/- इतके एकत्रित मानधन देण्याचे तसेच नियमांनुसार परिवीक्षा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च व्यवस्थापनाच्या मान्यतेनंतर सेवा नियमित करण्याचे आश्वासन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *