या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना रमण सायन्स सेंटर, नागपूर तसेच इस्रो – भारतीय अंतराळ संशोधन संस्था, बंगलोर व अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन, कुप्पम या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक संस्थांना शैक्षणिक क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे आणखी एक विषेश म्हणजे बेंगलोर येथे विद्यार्थ्यांना विमानाने नेण्यात येणार आहे.
सदर उपक्रमासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधक वृत्ती, आत्मविश्वास, जिज्ञासावृत्ती आणि तंत्रज्ञानाकडे आकर्षण निर्माण करणे हा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना थेट संशोधन संस्थांच्या कार्यपद्धतीची ओळख होणार असून भविष्यातील वैज्ञानिक आणि संशोधक घडविण्याच्यादृष्टीने ही क्षेत्रभेट एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे.
या क्षेत्रभेटीमध्ये तालुकास्तरावरून एकूण २१६ विद्यार्थी व शिक्षकांनी रमण सायन्स सेंटर, नागपूर तर जिल्हास्तरावरून ५३ विद्यार्थी व शिक्षक इस्रो (घ्एRध्) व अगस्त्या फाऊंडेशन, कुप्पम येथे भेट देण्याचे नियोजन आहे. सदर क्षेत्रभेटीसाठी विद्यार्थ्यांची निवड ही तालुका व जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून गुणानुक्रमे करण्यात येणार आहे.
संशोधनाची दिशा आणि प्रत्यक्ष अनुभवाचा लाभ मिळणार
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थीही राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या संधी, संशोधनाची दिशा आणि वैज्ञानिकांचे प्रत्यक्ष अनुभव समजून घेण्यास सक्षम होणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून भावी वैज्ञानिकांची पायाभरणी जिल्ह्यातून होईल. या उपक्रमाच्या नियोजनात जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे, असे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.मंगेश घोगरे यांनी कळविले आहे.