प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे
वर्धा : पक्षीनिरीक्षण केवळ पक्ष्यांना बघण्यापुरते सीमित न ठेवता तो आपल्या भावविश्वाचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांनी बहार नेचर फाउंडेशन, वनविभाग आणि बोर व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पक्षी सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात काढले.
सेवाग्राम आश्रम परिसरातील शांती भवनात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन नई तालीमचे सचिव कुणाल देसाई यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहारचे अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर होते. तर, वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी, बहारचे माजी अध्यक्ष किशोर वानखडे, आनंद निकेतनच्या मुख्याध्यापक जयमाला गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पक्षीनिरीक्षण करताना विद्यार्थ्यांनी त्यांचे रूपरंग, अधिवास, खाद्य आदी नोंदवतानाच पक्ष्यांच्या वर्तनाचाही अभ्यास करावा, असे मत कुणाल देसाई यांनी मांडले. जंगल हे निसर्गतः निर्माण होत असल्याने केवळ वृक्षारोपणाद्वारे ती उणीव भरून निघणार नाही, असे सांगून किशोर वानखडे यांनी जंगलांच्या संरक्षणाला प्राधान्य देण्यावर आपल्या भाषणात भर दिला. तर, पक्षी सप्ताहाची देण वनविभागाला बहारमुळे लाभली असून पर्यावरणीय प्रश्नांकडे अधिक संवेदनशील आणि सजगपणे पाहण्याची गरज असल्याचे वैशाली भलावी म्हणाल्या.
फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा, असे सांगून फटाक्यांच्या आतषबाजीमुळे केवळ पक्ष्यांसाठीच घातक नसून मानवी जीवनाला आणि एकूणच पर्यावरणासाठीही हानिकारक आहे, असे सांगून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन संजय इंगळे तिगावकर यांनी यावेळी केले. प्रारंभी वृक्षरोपाला पाणी देऊन या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आनंद निकेतनच्या विद्यार्थ्यांनी कवी अनंत भीमनवार लिखित ‘पाखरांची शाळा’ हे गीत सादर केले. बहारचे सचिव दर्शन दुर्धने यांनी प्रास्ताविकात बहार नेचर फाउंडेशनच्या वाटचालीचा आढावा घेत पक्षीसप्ताहाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. तर अतुल शर्मा यांनी आगामी वर्षात वर्धा जिल्ह्यात आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय पक्षिमित्र संमेलनाच्या पूर्वतयारीबाबत मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन बहारचे उपाध्यक्ष दीपक गुडधेकर यांनी केले व आभार कोषाध्यक्ष आकाश जयस्वाल यांनी मानले.
शेख, जयंत सबाने, शाळेच्या संचालक सुषमा शर्मा, जयश्री कामडे, शंकर भोयर, शैलेश कांबळे, सुरेश सदावर्ते, अमोल मानकर, तृप्ती शिंगारे यांच्यासह संपूर्ण शिक्षकवृंद तसेच बहारच्या सदस्यांचे सहकार्य लाभले. उद्घाटनापूर्वी परिसरातील शेतशिवार आणि तलावावर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पक्षीनिरीक्षण केले व त्याचा अहवाल कार्यक्रमात सादर केला. कार्यक्रमस्थळी जिल्ह्यात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
या सप्ताहात निसर्ग सेवा समितीचा ऑक्सिजन पार्क, रोठा तलाव, मदन धरण (जामनी), दिग्रज तलाव, इंगापूर टेकडी, पवनार येथील धाम नदी या अधिवासात पक्षीनिरीक्षण करण्यात येणार आहे. सप्ताहाचा समारोप गुरुवार, दि. १२ रोजी बोर व्याघ्र प्रकल्प परिसरात होणार आहे.