विहिरीवरील मोटारपंप चोरणाऱ्या टोळीचा सावंगी पोलिसांनी पर्दाफाश; पाच आरोपी अटकेत

२ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन गुन्हे उघडकीस

वर्धा : सावंगी मेघे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतशिवारांमध्ये विहिरीवरील मोटारपंप चोरीच्या वाढत्या घटनांचा छडा लावत सावंगी पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोटारपंप, वाहने, मोबाईल व तांब्याची तार असा एकूण २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडेगाव येथील शेतकरी राजेंद्र गोविंदराव डाबगव्हाणे यांनी तक्रार दिली होती. १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजाण्याच्या दरम्यान त्यांच्या शेतातील सिल्वहर कंपनीची ५ एचपी मोटार व केबल चोरीला गेली. त्याचप्रमाणे शेजारील शेतकरी दिलीप शामराव मसराम यांची किर्लोस्कर कंपनीची ३ एचपी मोटार व केबल आणि सुनील पुरुषोत्तम रेवतकर यांची ठरगो कंपनीची ३ एचपी मोटार व केबल चोरीस गेली होती. याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, यापूर्वीही सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेलसुरा रोड, बडद रोड आणि नागठाणा शिवातून चार मोटारपंप चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. मोटारपंप चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस निरीक्षक विनोद गिरी यांनी गुन्हे शोध पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

तपासादरम्यान पोलिसांना एका विधिसंघर्षित बालकाचा चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपल्या साथियोंच्या मदतीने मोटारपंप चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी ओम दिगंबर पठाडे (२२, रा. सालोड हिरापूर), सम्यक दीपचंद भरणे (१९, रा. देवळी), कुणाल उर्फ कृष्णा राजेंद्र राऊत (१९, रा. आगरगाव), जितेंद्र गरीबे कांबळे (२८, रा. आगरगाव) आणि आशिष अनंता आत्राम (१९, रा. धोत्रा रेल्वे) यांना अटक केली. चौकशीत आरोपींनी चोरी केलेले मोटारपंप सावंगी येथील राजीव नगर परिसरातील भंगार विक्रेता गोविंद गदई याला विकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी भंगार विक्रेत्याकडून चोरीचे मोटारपंप व त्याचे सुटे भाग जप्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *