राज्यस्तरीय पालक अधिकाऱ्यांकडून आरोग्य संस्थांची पाहणी

ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवांचा घेतला सविस्तर आढावा

वर्धा (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, उपलब्ध सुविधा आणि नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय पालक अधिकारी तथा आरोग्य सेवा, रुग्णालय-राज्यस्तर, मुंबई आयुक्तालयाचे उपसंचालक डॉ. डी. के. सोयाम यांनी जिल्ह्यातील विविध ग्रामीण व शहरी आरोग्य संस्थांना भेट देऊन सविस्तर पाहणी केली.

या पाहणी दौर्याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजसिंह पवार, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मंगेश रेवतकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पवार, आयुध अधिकारी डॉ. संदीप नखाते, वर्धा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिघेकर, जिल्हा कार्यक्रम प्रमुख डॉ. हाडके आणि जिल्हा सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी स्मिता वासनिक यांच्यासह संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

डॉ. सोयाम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, वायगाव निपाणी येथे भेट देऊन तेथील कामकाज, बाह्यरुग्ण सेवा, औषध उपलब्धता, तपासणी सुविधा आणि माता-बाल आरोग्य सेवांचा आढावा घेतला. तसेच आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळेत, सुलभ व दर्जेदार सेवा देण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर जिल्हा रुग्णालय, वर्धा येथे भेट देऊन रुग्णालयातील विविध विभाग, वैद्यकीय सेवा, निदान सुविधा, स्वच्छता आणि औषधांच्या उपलब्धतेची पाहणी करण्यात आली.

त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, सेलू येथे भेट देऊन तेथील रुग्णसेवा, औषधसाठा व एकंदरीत कार्यक्षमतेची तपासणी करण्यात आली. शहरी भागाचा विचार करता वर्धा शहरातील स्नेहलगंज येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, इंदिरा नगर येथील नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र, तसेच आयुष्यमान आरोग्य मंदिर व नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र येथेही भेट देऊन पाहणी करण्यात आली.

या पाहणीदरम्यान डॉ. सोयाम यांनी आरोग्य संस्थांमधील साधनसामग्री व मनुष्यबळाचा प्रभावी वापर करणे, आवश्यक औषधे व तपासणी सुविधा निरंतर उपलब्ध ठेवणे आणि आरोग्य कार्यक्रमांची सक्षम अंमलबजावणी करण्याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या राज्यस्तरीय पाहणीमुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवांची प्रत्यक्ष स्थिती स्पष्ट झाली असून, आरोग्य सेवा अधिक सक्षम व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी आवश्यक सुधारणांना नक्कीच चालना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *