जिल्हाधिकारी वानमथी यांचा सुधारित आदेश
शासकीय पाणीटंचाई निवारण कामांना सूट
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई
वर्धा : अपुरे पर्जन्यमान आणि जलाशयातील कमी साठ्यामुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नवीन बोरवेल व खोदकामे तसेच विद्यमान बोरवेल अधिक खोल करण्याच्या कामांवर पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष वानमथी सी यांनी यासंदर्भात सुधारित आदेश जारी केला आहे. ही बंदी जिल्ह्यातील संपूर्ण शहरी व ग्रामीण क्षेत्रासाठी लागू राहणार आहे.
शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे भूजल स्रोतांचे संरक्षण करणे, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरील अतिरिक्त ताण कमी करणे आणि आगामी काळातील पाणी टंचाईची तीव्रता रोखण्यासाठी प्रतिबंधनात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
शासकीय कामांसाठी परवानगी
शासकीय पाणी टंचाई निवारणाची कामे, सार्वजनिक हिताकरिता खोदण्यात येणाऱ्या आवश्यक विहिरी व कुपनलिका यांना परवानगीची आवश्यकता नाही. आर्थिक लक्षांक पूर्ण करण्यासाठी शासनाने विविध विभागामार्फत घेण्यात येणारे पात्र लाभार्थ्याचे नवनिर्माण, अपूर्ण सिंचन विहिरीच्या कामांना पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नाही. परंतु संबंधित विभागास विहिरी व कुपनलिका खोदकामाची माहिती जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांना देणे बंधनकारक राहील.
घरगुती वापरासाठी बोरवेल खोदकामास सूट
या बंदीतून घरगुती वापरासाठी करण्यात येणारी २०० फुटापर्यंत बोरवेल खोदकामे, जुन्या बोरवेलचे फ्लशिंग करण्याची कामे, त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी, अस्तित्वात असलेल्या विहिरीचे खोलीकरण करणे, पाणीटंचाई निवारणासाठी करण्यात येणाऱ्या बोरवेल खोदकामांना सूट देण्यात आली आहे. शासकीय यंत्रणेच्या अधिकृत कार्यदेशानुसार कंट्रॅटदारांमार्फत करण्यात येणाऱ्या कामांनाही हा अपवाद लागू असेल.
अवैध खोदकामाची क्षेत्रीय तपासणी
तहसीलदारांमार्फत पोलिस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या समन्वयाने प्रतिबंधित खोदकामांची क्षेत्रीय तपासणी करण्यात यावी. महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती, पंचायत समिती अधिकाऱ्यांनी संबंधित प्रभाग, ग्रामपंचायती व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना आदेशाची माहिती देऊन त्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी. तलाठी आणि ग्रामसेवकांनी प्रतिबंधित खोदकाम आढळल्यास तत्काल संबंधित तहसीलदारांना माहिती द्यावी, असे आदेशात नमूद आहे.
उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई
बंदीचे उल्लंघन करून बोरवेल खोदकाम सुरू असल्याचे आढळ्यास सक्षम अधिकाऱ्यांनी ते काम तात्काळ थांबवावे. संबंधित ठिकाणचा स्थळपंचनामा करून छायाचित्रे आणि मालक, कंट्रॅटदार व यंत्रचालकांचा तपशील नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा अंमलबजावणीत अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमार्त कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.