बोर अभयारण्यातील जंगल सफारीगेट पर्यटकांसाठी खुले

वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ, पहिल्या पर्यटकांचा सन्मान

वर्धा (जिमाका) : बोर व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने २ ते ८ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करून राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या वन्यजीव सप्ताहाचा शुभारंभ आणि बोर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीचा शुभारंभ आज करण्यात आला.

याप्रसंगी बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेगडी, सहाय्यक वनसंरक्षक (कोअर) आशिष देशमुख, सहाय्यक वनसंरक्षक (बफर) दत्तात्रय लोंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. जंगल सफारीच्या शुभारंभ प्रसंगी नागपूर व अन्य ठिकाणाहून बोर व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारीसाठी आलेल्या कुटुंबियांना बोर व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर जंगल सफारीसाठीच्या जिप्सी कोअर क्षेत्रातील जंगल सफारी ट्रॅकच्या दिशेने सोडण्यात आल्या.

बोर प्रकल्पात पहिल्या दिवशी जंगल सफारी करणाऱ्यांमध्ये वर्धा येथील संजय सरदार, प्रविण जैन, गुजरात येथील विजय पटेल, नागपूर येथील ऋषिकेश निमकाडे, ओमकार पुरंदरे, निरज साठे, मुंबई येथील राहुल हिरनवले, काटोल येथील अनिकेत भोयर यांचा समावेश आहे. काही पर्यटकांनी कुटुंबियांसह बोर जंगल सफारीचा आनंद घेतला.

जंगल सफारीच्या उद्घाटनानंतर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, शिवाय नवीन बोर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन, बोर व्याघ्र प्रकल्पाच्या चित्रफितीचे प्रदर्शन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दि. ३ ऑक्टोबर रोजी शाळांमध्ये वन्यजीव विषयावर पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व प्रश्नोत्तरे स्पर्धा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण व वनसृष्टी बद्दल जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

रविवारी पक्षीनिरीक्षणाचा उपक्रम

रविवार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत शालेय विद्यार्थी व पक्षीप्रेमींकरिता पक्षी निरीक्षणाचा उपक्रम तर ५ ऑक्टोबरला सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत वर्धा-बोरधरण दचाकी रॅली व वनपरिक्षेत्राधिकारी हिंगणी-बोरधरण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी अधिकारी व कर्मचारी, गाईड, जिप्सी चालक तसेच स्थानिक रहिवाशी यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबीर होईल.

६ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा, कर्मचारी, गाईड, जिप्सी चालकांकरिता फोटोग्राफी स्पर्धा, ७ ऑक्टोबर रोजी गवत कुरण विकास कार्यशाळा व महिला सशक्तीकरण कार्यशाळा, ८ ऑक्टोबर रोजी बक्षीस वितरण सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *