वर्धा : देशातील ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या स्पष्ट होणे अत्यंत गरजेचे असून, ओबीसी जनगणनेचा मुद्दा आगामी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ठामपणे लावून धरणार असल्याचे खासदार अमर काळे यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत त्यांनी ओबीसी जनगणना, शेतकरी प्रश्न तसेच निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधातील आंदोलनाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ ला वर्धा येथे आयोजित ओबीसी जनगणना परिषदेच्या प्रसंगी खासदार अमर काळे यांनी हे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला माजी मंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री पंकज भोयर, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, ब किरण ठाकरे, शेखर शेंडे, अभ्युदय मेघे, उमेश कोरामा, डॉ. अशोक चोपडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
देशाच्या एकूण लोकसंख्येत ओबीसी समाजाचा नेमका वाटा किती आहे, याची अधिकृत आकडेवारी समोर येणे आवश्यक आहे. ओबीसींची लोकसंख्या स्पष्ट झाल्याशिवाय त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी योग्य धोरणे आखणे कठीण असल्याचे काळे यांनी नमूद केले. केंद्र सरकारकडून या विषयावर अद्याप ठोस पाऊल उचलण्यात आलेले नसल्याची टीका करत, आगामी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न संसदेत प्रभावीपणे उपस्थित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी प्रश्नांवर बोलताना काळे यांनी भाजपाच्या काही नेत्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. शेतकरी वर्गाच्या अडचणी समजून घेण्याऐवजी त्यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे उत्पन्न, उत्पादन खर्च, शेतीमालाला मिळणारा भाव आणि त्यांच्या विविध समस्यांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या भूमिकेच्या निषेधार्थ १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत ‘इंडिया अलायन्स’तर्फे मोर्चाचे व सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनात देशभरातून तसेच महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते सहभागी होणार असून, वर्ध्यातूनही मोठा सहभाग राहणार असल्याचे खासदार अमर काळे यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेसंदर्भातील प्रश्न या आंदोलनातून उपस्थित केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ह्या यशस्वी आयोजनाबाबत खासदार अमर काळे यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
