बजाज विज्ञान महाविद्यालयात नवमतदार नोंदणी शिबिर; विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम
वर्धा (जिमाका) : मतदानाचा अधिकार हा केवळ अधिकार नसून लोकशाही प्रक्रियेतील महत्वाची नागरी जबाबदारी आहे. वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी ज्या प्रकारे आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाते, त्याचप्रमाणे पात्र नागरिकांनी वेळेत मतदार यादीत आपले नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे, तसेच पात्र विद्यार्थ्यांनी स्वतःची मतदार नोंदणी करण्यासोबतच आपल्या कुटुंबातील व परिसरातील पात्र नागरिकांनाही मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.
बजाज विज्ञान महाविद्यालय येथे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत वर्धा विधानसभा मतदारसंघातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नवमतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षा मंडळाचे सभापती संजय भार्गव तर प्रमुख पाहुणे म्हणून मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कुश मोटवाणी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार संदिप पुंडेकर यांची उपस्थिती होती.
या शिbidमध्ये १८ ते १९ वर्षे वयोगटातील पात्र विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आवश्यक असलेल्या नमुना अर्ज क्रमांक ६ भरून देण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्राचार्य डॉ. प्रदीप टेकाडे यांनी महाविद्यालयातील १८ वर्षे पूर्ण केलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी ECINet प्रणालीद्वारे ऑनलाइन Form-6 भरून मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन केले. शिबिरास महाविद्यालयातील सुमारे २१० विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कार्यरत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीची प्रत्यक्ष प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नायब तहसीलदार अतुल रासपायले, अनुप राऊत, संजय नाखले, उपप्राचार्य प्रफुल भोयर, समन्वयक दिलीप आंबाडकर, मंगेश गिरडे, पर्यवेक्षक प्रशांत सातपुते, बीएलओ किरण बडवाईक, श्री. नगराळे, सुभाष अलवाडकर, विनोद जांभूळकर, किशोर बारपात्रे, योगेश अंधारे यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रफुल भोयर यांनी मानले, या नवमतदार नोंदणी शिबिराच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांमध्ये मतदार नोंदणी, मतदानाचा अधिकार आणि लोकशाहीतील सहभागाबाबत जनजागृती करण्यास महत्वपूर्ण योगदान मिळाले.