प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे:वर्धा : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांनी, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यावेळी अनेक जणांनी भगवा फेटा परिधान केला होता. शहरात शिवजयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुणाईचा सागर उसळला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रपरिवाराने पुतळा परिसरात साकारलेली प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र ठरली. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, क्षत्रिय मराठा परिषद, अ. भा. मराठा सेवा संघासह विविध संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला. शहरातील विविध भागांतून उत्स्फूर्तपणे रॅली काढण्यात आल्या.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. वर्ध्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळपासूनच शिवभक्तांची गर्दी उसळली होती. यावेळी ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी’… अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत निनादला. सर्वत्र ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष घुमत होता. शहरात तसेच ग्रामीण भागात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगीते वाजविण्यात येत होती. संपूर्ण शहरात चैतन्य संचारले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रपरिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.