प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे सेलु : १२ कोटींचा निधी मंजूर असूनही हिंगणी ते आमगाव रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम विधानसभा निवडणुकीनंतर अचानक थांबले. यामुळे प्रवाशांचे आणि परिसर लोकांचे हाल; माजी जि.प. अध्यक्षांच्या गावातही दुर्लक्ष? तालुक्यातील हिंगणी ते आमगाव या सुमारे १४ किलोमीटर लांबीच्या महत्त्वाच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि रुंदीकरणाचे काम विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठ्या उत्साहात सुरु झाले होते.
मात्र निवडणुकीचा निकाल लागताच या कामाची गती पूर्णपणे थांबली आणि ठेकेदाराने सर्व साहित्य घेऊन येथून ‘पोबारा’ केला. १२ कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही काम थांबले, याचे कोडे आजतागायत परिसरातील नागरिकांना उलगडलेले नाही. ₹१२०० लाखांचे निधी मंजूर, तरीही रस्त्याची दुरवस्था असे का? माजी आमदार आजचे राज्यमंत्रीपद भूषविणारे मा. पंकजजी भोयर यांच्या प्रयत्नातून अर्थसंकल्प निधी सन २०२१-२०२२ अंतर्गत हिंगणी-सोंडी-आमगाव-मालेगाव (१४ कि.मी.) या रस्त्याचे मजबुतीकरण व रुंदीकरण करण्यासाठी तब्बल ₹१२०० लक्ष रुपये (१२ कोटी) किंमतीचे अंदाजपत्रक मंजूर झाले होते. सोंडी येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजनही गाजावाजात पार पडले होते.
हा रस्ता पूर्णपणे जंगलाच्या मध्यभागातून धामणगाव, सालई कला, सोंडी, आमगाव मार्गे आर्वी तालुक्यातील कारंजा गावाला जोडतो. अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असूनही, मागील दीड वर्षापासून रस्त्याची अक्षरशः ‘चाळणी’ झाली आहे. प्रवाशांना होणारा मनवाचा आजार आणि वाहनांना होणारी मोडतोड यासाठी होणारा दुरुस्तीचा खर्च विनाकारण सोसावा लागत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.