प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे,वर्धा : सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांचे वास्तव्य व स्वतंत्रता आंदोलनाच्या कितीतरी योजना या सेवाग्राम आश्रमातून निश्चित झालेल्या आहेत. एवढेच नाही तर स्वतंत्रता आंदोलने या आश्रमातूनच लढल्या गेली आहेत. या आश्रमात गांधीजींना भेटण्याकरिता अनेक मोठे नेते जसे पं. नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद इतकेच नाही तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा यायचे.
यामुळे सेवाग्रामला जागतिक पातळीवर एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्वातंत्र्यानंतर सुद्धा सेवाग्राम येथे पर्यटकांना येण्यास सोय व्हावी म्हणून सेवाग्राम रेल्वे स्टेशनची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे देशातीलच नव्हे तर जगातील पर्यटक गांधीजींच्या स्मृती जोपासण्यासाठी सेवाग्रामला येतात. याचीच एक आठवण म्हणून रेल्वे विभागाने एक गाडी सुरु केली ती नागपूर-दादर-नागपूर ही एक्स्प्रेस गाडी हिलाच ‘सेवाग्राम’ नाव देण्यात आले.
दु:ख एवढेच आहे की, जागतिक पर्यटन स्थळ व गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीच्या नावावर जी सेवाग्राम एक्स्प्रेस नावाने गाडी सुरु करण्यात आली तिला सेवाग्राम स्टेशनवरच थांबा नसणे हा तर फारच दुर्दैपूर्ण आहे. एवढेच नाही तर दक्षिणेकडे जाणाऱ्या सर्वच गाड्या सेवाग्राम स्टेशनवरूनच जावे लागते. त्या नागपूर मुंबईकडून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला दक्षिणेकडे जाण्यासाठी या स्टेशनवरच उतरावे लागते. त्यामुळे सेवाग्राम स्टेशनवर सेवाग्राम एक्स्प्रेसला थांबा देण्यात यावा या मागणीसाठी खासदार अमर काळे यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली आहे.
यासोबतच त्यांनी तेलंगणा एक्स्प्रेस १२७२४ ला सेवाग्राम स्टेशनवर थांबा देण्याची सुद्धा मागणी केली आहे. सेवाग्राम येथील हॉस्पीटलमध्ये येणारे रुग्ण कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी व सेवाग्राम स्टेशनवरून चंद्रपूर येथे सकाळपासून दुपारपर्यंत जाण्याकरिता एकही गाडी नसल्याने तेलंगणा एक्स्प्रेसला सेवाग्राम येथे थांबा देण्याबाबत त्यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली आहे.
यासोबतच त्यांनी बडनेरा ते नरखेड धावणारी मेमू ट्रेन नागपूरपर्यंत नेण्याची मागणी केली आहे. नरखेड, वरूड, मोर्शी, काटोल हा भाग संत्रा हब म्हणून ओळखला जातो येथील संत्रा बाहेर देशात पाठविला जातो. त्यामुळे येथे व्यापाऱ्यांची सतत ये-जा असते. इतकेच नाही तर ही गाडी नागपूरपर्यंत गेल्यास नागपूरवरून नरखेड, वरूड, मोर्शी, काटोल या भागात येणाऱ्या व याच भागातून बडनेरा येथे मुंबईला जाण्यासाठी बडनेरापर्यंत जाणे येणे करिता एकदम सोयीची गाडी असल्याने बडनेरा नरखेड ही मेमू गाडी नागपूरपर्यंत नेण्याची सुद्धा खासदार अमर काळे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.
कोविड-१९ पासून रेल्वे विभागाने जे विविध निर्बंध रेल्वे गाड्यांचे थांबे व गाड्या सुरु करण्यावर लादले होते, त्या पूर्ववत करण्याबाबत खासदार अमर काळे यांचा रेल्वे विभागाकडे सतत पाठपुरावा सुरु असून हा पाठपुरावा पूर्ण थांबे रेल्वे गाड्या पूर्ववत होईपर्यंत सुरु राहील असेही मत खासदार अमर काळे यांनी व्यक्त केले.