डॉ. कुमारप्पा पाणी वापर संस्थेची पाटबंधारे विभागाकडे निवेदनाव्दारे मागणी
अभय बैदमोहता
प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे
सेलू : यावर्षी झालेल्या कमी पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, योग्य वेळी पाऊस न पडल्याने कापूस आणि इतर पिके सुकू लागली आहेत. हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास हिरावला जाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने, पिकांना वाचवण्यासाठी बोरणधरणाचे पाणी सिंचनासाठी तातडीने सोडण्यात यावे, अशी जोरदार मागणी ‘डॉ. कुमारप्पा पाणी वापर संस्था, सेलडोह’ आणि परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
यासंदर्भात पाटबंधारे उपविभाग कार्यालय, सेलू येथील सहाय्यक अभियंता श्रेणी-१ यांना रीतसर निवेदन देखील सादर करण्यात आले आहे.
पिंपरा मुख्य कालव्यावरील शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचवणे गरजेचे असलेले निवेदनात नमूद केल्यानुसार, पिंपरा मुख्य कालव्यावरील हिवरा आणि सिंदी (रेल्वे) या शेवटच्या टोकावर पाणी पोहोचवण्यासाठी किमान एका महिन्याचा कालावधी लागतो.
त्यामुळे आमगाव, खडकी, धोंडगाव, सेलडोह, हिवरा आणि सिंदी (रेल्वे) परिसरातील पिकांना वाचवण्यासाठी विनाविलंब निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे.
पावसाच्या अभावामुळे पिके सुकत चालली असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. जर वेळेत सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले नाही, तर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन संपूर्ण पीक हातातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे शासन स्तरावर तातडीने निर्णय घेऊन बोरणधरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
सदर निवेदन डॉ. कुमारप्पा पाणीवापर संस्था, सेलडोहचे अध्यक्ष श्री. एम. एस. खोडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले असून, या निवेदनाची प्रत वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजभाऊ भोयर यांनाही माहिती व पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आली आहे.