भूजल पुनर्भरण सामूहिक चळवळ होण्याची गरज, नगर परिषद, व्हीजेएमच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहितीवर्धा : पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. कित्येक वर्षांपासूनचे पाणी भुगर्भात साठविलेले आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो, पाण्याचे महत्त्व जाणून घेत पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविला पाहिजे. जलपुनर्भरण ही सामूहिक चळवळ झाली आहे. वर्ध्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग, भूजल पुनर्भरण तसेच स्पंज सिटी प्रकल्प राबविण्यात येत आहे. नगर परिषद आणि वैद्यकीय जनजागृती मंचाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. नगर परिषदेत नगराध्यक्षांच्या कक्षात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, वैद्यकीय जनजागृती मंचाचे डॉ. सचिन पावडे, श्याम भेंडे यांची उपस्थिती होती.
उन्हाळ्याच्या कालावधीत जल पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय चर्चेला येतो. मात्र पावसाळा सुरू होताच या विषयाकडे दुर्लक्ष होते. मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी पडते वाहून जाते. पावसाच्या पाण्यातून जलपुनर्भरण करण्याकरिता स्पंज सिटी उपक्रम राबविण्यात येणार आहे. वर्ध्यातील मोकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला पालिकेच्या निर्णयानुसार खड्डे करायचे आणि त्यात रस्त्याने वाहून जाणारे पाणी मुरवायचे, असा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे पाणी जमीनीत मुरल्याने पाणी पातळी वाढते. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल, नागरिकांनी घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग लावूनही पावसाचे पाणी वाचविणे सहज शक्य असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
स्पंज सिटीमुळे शहरी पूर, जलसंकट कमी होण्यास मदत होते. पाणी साचने, वाहतूक विस्कळीत होणे कमी होते. भूजल पातळी वाढते. टँकरवरील खर्च व अवलंबीच्च कमी होते. झाडे, पर्यावरण व जैवविविधता वाढते. नागरिकांनी प्रत्येक घराबर रेन वॉटर हार्वेस्टिंग करावे. पावसाचे पाणी नाल्यात जाऊ देऊ नये. झाडे लावावीत. कौक्रीटीकरण कमी करावे. नागरिकांनी छाताचे, पावसाचे पाणी थेट बोअर, विहिरीत न सोडता योग्य पद्धतीचा अवलंब करावा. भूजल पुनर्भरणणात सहभाग घेत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.