वर्धा नदीपात्रातून वाळूचा अवैध रित्या उपसा करून चोरटी वाहतूक करणाऱ्यां विरोधात उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी मोहीम राबविली. उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव डॉ. वंदना कारखेले यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार यांच्यासह तात्काळ आपटी शिवारात नाकाबंदी केली. त्यावेळी वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक मनीष सुरेश मनवर, रा. नाचणगाव, सदानंद रंगराव चव्हाण, रा. नाचणगाव हे ट्रॅक्टर मालक पंकज अरुणराव मेड्डे रा. पुलगाव यांच्या सांगण्यावरून नदी पात्रातून शासनाचा महसूल बुडवून वाळूची अवैध रित्या वाहतूक करताना मिळून आले.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी ट्रॅक्टर, वाळूसह ६ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशनाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना कारखेले, पोलीस अंमलदार रामदास दराडे, प्रवीण घनमोडे, भूषण हाडके, शुभम कावळे यांनी केली.