केळझर येथे ६८ वर्षीय वृद्धाची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

सेलू : तालुक्यातील केळझर येथील एका ६८ वर्षीय वृद्धाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. रायबा कुंंबरे (वय ६८ वर्षे) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे केळझर परिसरासह संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सेलू पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, रविवारी दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना रायबा कुंबरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. कुंबरे यांचे नवीन घर नुकतेच बांधून पूर्ण झाले होते. मात्र, अद्याप या घराचा गृहप्रवेश झाला नसल्यामुळे ते या नवीन घरात एकटेच राहत होते.

दुपारच्या सुमारास एक शेजारी काही कामानिमित्त त्यांना भेटण्यासाठी घरी गेला असता, दरवाजा उघडताच रायबांजी हे छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हा धक्कादायक प्रकार समोर येताच गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती सेलू पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलू ग्रामीण रुग्णालय येथे रवाना केला. रायबा कुंबरे यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सून आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या या अकस्मात जाण्याने कुंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून केळझर गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस या आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *