दहेगाव – केळझर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे भाजपच्या युवा पदाधिकाऱ्याचा राजीनामा

पालकमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन सुपूर्द केले पत्र

अभय बैदमोहता

प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे

सेलू : तालुक्यातील दहेगाव ते केळझर रस्त्याच्या मंद गतीने चाललेल्या कामामुळे आणि गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना सहन करत लागत असलेल्या त्रासामुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्याने आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे समुद्रपूर/हमदापूर मंडळ उपाध्यक्ष, युवा मोर्चा सर्कल प्रमुख तसेच बूथ प्रमुख (दहेगाव गो.) सचिन अशोकराव महाबुधे यांनी गुरुवारी दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी आपला राजीनामा सादर केला.

त्यानंतर शुक्रवारी दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री व आमदार मा. पंकजभाऊ भोयर हे पीक पाहणी दौऱ्यावर आले असता, सचिन महाबुधे यांनी त्यांची सदैच्छा भेट घेऊन राजीनाम्याची प्रत त्यांच्याकडे सुपूर्द केली.

राजीनाम्याचे कारण मा. पालकमंत्री पंकज भाऊ भोयर यांनी विचारले असता सचिन महाबुधे यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की, ‘केंद्र व राज्यात आपलेच भाजप सरकार असून हिंगणघाट व वर्धा मतदारसंघात भाजपचेच आमदार आहेत. तरीही दहेगाव-केळझर रस्त्याकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष का केले जात आहे? आम्ही पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून आम्हाला पदे दिली, पण जर आम्ही आमच्या गावाच्या विकासासाठी आणि रस्त्याच्या कामासाठी काही करू शकत नसेल तर अशा पदाचा काय उपयोग? कित्येक वर्षांपासून अनेकदा निवेदने दिली, आंदोलने केली, परंतु प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासना पलीकडे काहीच मिळाले नाही. गावातील जनता तसेच मतदार आता आम्हाला जाब विचारत आहे.’

गावातील रस्ता लवकरात लवकर मार्गी लागावा, या उद्देशाने आणि जनतेच्या भावनेचा आदर करत सचिन महाबुधे यांनी आमदार समीरभाऊ कुणावार यांना उद्देशून लिहिलेला राजीनामा पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे सुपूर्द केला व दहेगाव-केळझर रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची विनंती केली. या निर्णयामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात आणि भाजप पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *