वर्धा (जिमाका) : जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागाच्यावतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून बालक, माता व कुटुंबाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यात माझी अंगणवाडी माझी जबाबदारी, चिमुकल्यांसाठी २१ दिवस २१ गोष्टी, आजी आजोबांसोबत गप्पा अशा उपक्रमांचा समावेश आहे. गरोदर माता व स्तनदा मातांना आरोग्य, पोषण व माता-बाल संगोपनाबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळावे, यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांच्या कार्यक्षेत्रात ‘माता गट’ स्थापन करण्यात येत आहेत. या गटांमध्ये गरोदर माता तसेच स्तनदा मातांचा समावेश करण्यात येणार आहे. माता गटाच्या माध्यमातून मातांना संतुलित आहार, गरोदरपणातील काळजी, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची काळजी, स्तनपान, बालकांचा पूरक आहार, स्वच्छता, बालकांची वाढ व विकास तसेच उपलब्ध आरोग्य व पोषण सेवाबाबत नियमित मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मातागटाच्या नियमित बैठकीमध्ये अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य विभागातील संबंधित कर्मचारी तसेच आवश्यकतेनुसार तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून मातांना मार्गदर्शन करण्यात येईल. मातांच्या समस्या, अनुभव व अडचणी जाणून घेऊन त्याबाबत योग्य मार्गदर्शन व आवश्यक सेवांशी समन्वय साधण्यात येणार आहे. ‘माझी अंगणवाडी, माझी जबाबदारी’ याबाबत सामुदायिक प्रतिज्ञा घेण्यात येईल. अंगणवाडी केंद्र स्वच्छ, सुरक्षित, सुंदर व कार्यक्षम ठेवण्यासाठी तसेच बालकांच्या पोषण, शिक्षण व आरोग्यासाठी समुदायाचा सहभाग वाढविण्यासाठी हा उपक्रम आहे. अंगणवाडी केंद्रातील बालकांसाठी २१ दिवस २१ गोष्टी, आजी-आजोबांसोबत गप्पा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपક્રमामधून बालकांना आजी- आजोबांच्या अनुभवातून गोष्टी, संस्कार, पारंपरिक ज्ञान आणि जीवनमूल्यांची ओळख करून देण्यात येणार आहे.
आहे. अंगणवाडी केंद्रांमध्ये उपलब्ध स्थानिक व टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर करून शून्य किंवा अत्यल्प खर्चात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी ‘दि प्लॅनेट फ्रेंडली प्लेस्कूल’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत अंगणवाडी सेविका आपल्या कल्पकतेचा वापर करून उपलब्ध साहित्यापासून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त शैक्षणिक साहित्य, खेळणी, अध्ययन कोपरे, पोषण व स्वच्छता विषयक उपक्रम तसेच विविध कृती-आधारित शिक्षण साधने तयार करणार आहेत. तसेच अंगणवाडी परिसरात पोषण बाग, अध्ययन कोपरा, खेळातून शिक्षण, स्वच्छता व आरोग्य जनजागृती कोपरा यांसारखे उपक्रम राबवून बालकांना आनंददायी व बालस्नेही वातावरण उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे, जिल्हा परिषद महिला व बालविकासच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी कळविले आहे