प्रतिनिधी/ दै.प्रतापगडचे वारे
सेलू : मृत्युनंतर प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने अखेरचा निरोप मिळणे अपेक्षित असते, मात्र सेलू तालुक्यातील वर्धा-नागपूर राज्य मार्गावरील जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सेलडोह येथे प्रशासनाच्या ढिम कारभारामुळे एका महिलेवर चक्क अंधारात अंत्यसंस्कार करण्याची अमानुष वेळ आली. स्मशानभूमीत विजेची कसलीही सोय नसल्याने अंत्यविधी करताना नातेवाईकांना मोबाईल टॉर्च आणि दुचाकीच्या हेडलाईटचा सहारा घ्यावा लागला. या लाजीरवाण्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसला आहे.
सेलडोह येथील सुरजकला शंकर आवते यांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंब व नातेवाईकांनी त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी सेलडोह येथील स्मशानभूमीत नेले. परंतु स्मशानभूमीत विजेची कोणतीही व्यवस्था नसल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडालेला होता. शेडमध्येही प्रकाशाची सोय नव्हती. स्मशानभूमीच्या परिसरात झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढल्याने जनावरांचा वावर असतो, ज्यामुळे रात्रीच्या वेळी अंत्यविधी करताना मोठी कसरत करावी लागली. अखेर दुचाकीची हेडलाईट आणि मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात कसातरी अंत्यविधी पार पाडला.
सेलडोह स्मशानभूमीत सोलर लाईट, पाणी आणि नियमित साफसफाईची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून यापूर्वीही वारंवार करण्यात आली होती. मात्र, ढिम प्रशासनाने नागरिकांच्या या मूलभूत सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. अनेकदा मागणी करूनही प्रशासन जर लक्ष देत नसेल, तर याला काय म्हणावे? विशेष म्हणजे, निवडणुकीच्या काळात एका मताच्या ऐवजी पावभर मटनाची भाजी आणि दारूच्या एका बाटलीवर आपल्या गावाची दिशा व दशा विसरून जाणारे नागरिक, नंतर पाच वर्षे नुसते बोमलात बसतात. उघड्या डोळ्यांनी ही परिस्थिती पाहणारे ग्रामस्थ कधी जागे होणार? प्रशासनाच्या या ढिम्म कारभाराविरोधात आतातरी सर्व परिस्थिती उघड्या डोळ्याने पाहुन ही येथील जनतेचे डोळे उघडतील काय? असा संतप्त सवाल सुजाण नागरिकांमधून विचारला जात आहे.
‘अंत्यसंस्कारासाठी अंधाराचा सामना करावा लागत असेल, तर ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. ‘ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने येथील स्मशानभूमीत वीज किंवा सोलर लाईट, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेची व्यवस्था करावी अशी आमची मागणी आहे.’
– ग्रामस्थ, सेलडोहवासी
