नगरपरिषदेच्या पाच शाळांच्या नूतनीकरणाचे लोकार्पणसेवा संकल्प अभियानांतर्गत शाळा लोकार्पणाचा उपक्रम
वर्धा (जिमाका) : नगर परिषदेच्या अनेक वर्षापासून सुरु असलेल्या शाळा खाजगी शाळांच्या स्पर्धेत पट संख्येअभावी कमी होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात सुरु असलेल्या स्पर्धेत शासकीय शाळांना टीकून ठेवण्यासाठी या शाळांचा शैक्षणिक दर्जा व आवश्यक सोयीसुविधा निर्माण करुन देण्यावर भर असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या জন্মदिनानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर यादरम्यान सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानिमित्त आज नगर परिषदेच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या आणि अनेक वर्षापासून जुन्या झालेल्या प्राथमिक शाळांच्या इमारतीचे वैशिष्टपूर्ण निधी व दलित्त्तर निधी अंतर्गत नूतनीकरणाचे बांधकाम करण्यात आले. त्याच्या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला खासदार मायाताई इवनाते, नगर परिषद अध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकुर, बांधकाम सभापती राखी पांडे, शिक्षण सभापती प्रियंका खंगार, गटनेते विलास आगे, नगरसेवक वंदना मुंडे, शिक्षण प्रशासन अधिकारी उषा तळवेकर, उपमुख्यधिकारी अभिजित मोटघरे आदी उपस्थित होते.
खाजगी शाळांमध्ये मिळत असलेल्या सोईसुविधांमुळे विद्यार्थ्यांचा कल या शाळांकडे वाढलेला आहे. यासाठी शासकीय शाळांची गुणवत्ता कशी वाढविता येईल? यावर शासनाचा भर असून डिजिटल शिक्षणाची सुविधा, अत्याधुनिक आवश्यक सोयीसुविधा निर्माण करुन देण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठी नवोपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले. शहरातीलकाही मागास परिसरत असलेल्या शाळा डिजिटल शाळा बनविण्यात येणार असून विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण सुद्धा तयार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले. आजच्या स्पर्धेच्या युगात टीकून राहण्यासाठी शिक्षण फार महत्वाचे आहे. हे महत्व जाणून शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यासोबतच शाळांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे. शासकीय शाळांमधून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज मोठ्या पदावर काम करीत आहे. पालकांनी अशा विद्यार्थ्यांचे अवलोकन करुन आपल्या पाल्याना शासकीय शाळेत दाखल करावे, असे आवाहन खासदार मायाताई इवनाते यांनी केले. केवळ शाळांचे बांधकाम करुन चालणार नाही, यासाठी शाळा समितींनी सुद्धा पुढाकार घेऊन शाळांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांचे प्रयत्न आवश्यक आहे. शिक्षणाची गंगा अविरत सुरु राहण्यासाठी ज्ञानाचा वसा घेतला पाहिजे, असे सुधीर पांगुळ म्हणाले. शिक्षण सभापती प्रियंका खंगार यांनी पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने नगरपरिषद शाळेचे स्वरुप बदलत आहे. आता या शाळांमध्ये चांगल्या शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्याने शाळांची पटसंख्या वाढेल. खाजगी शाळेप्रमाणेच येथे देखील शिक्षण उपलब्ध होईल, असे सांगितले. तत्पूर्वी पालकमंत्री डॉ.भोयर यांनी वसंत प्राथमिक शाळा, स्वामी विवेकानंद व मोतीलाल नेहरू प्राथमिक शाळा, लाला लजपतराय उच्च प्राथमिक शाळा, शिवाजी व सिंधी हिंदी प्राथमिक शाळा व महाराणा प्रताप प्राथमिक शाळा येथे जाऊन नूतनीकरण कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बांधकाम व नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.