मजिप्राच्या कामाचा घेतला आढावाप्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे,वर्धा : मागील ९ दिवसांपासून पिपरी मेघे प्लस १३ गावांचा पाणी पुरवठा बंद आहे. होळीचा सण आला आहे. उन्हाळ्याची देखील चाहूल लागली आहे. अशा परिस्थितीत योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामाच्या ढिसाळपणा बद्दल पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नाराजी व्यक्त करीत तातडीने या गावांना पाणी पुरवठा करण्याचे निर्देश दिले.
रविवारी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात मजिप्रा व जिप च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व संबंधित गावातील सरपंच व लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, मजिप्राचे कार्यकारी अभियंता भुराडे, जिप ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता धिरज परांडे, मजिप्राचे उपअभियंता दीपक धोटे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता ज्ञानेश्वर गिराम उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी पिपरी प्लस १३ गावांसाठी असलेल्या योजनेतंर्गत टाकण्यात येत असलेल्या मुख्य पाईप लाईनच्या कामांचा आढावा घेतला. मजिप्राचे कार्यकारी अभियंता भुराडे यांनी चार किमी ची मुख्य पाईप लाईन टाकण्यात येत असल्याची माहिती दिली. येकाकेला पंपिंग स्टेशन पासून मर हनुमान टेकडी पर्यंत सात किमीची मुख्य पाईप लाईन असून यापूर्वी तीन किमीचे काम करण्यात आले असल्याचे सांगितले. उर्वरित चार किमी पाईप लाईनचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी पिपरी प्लस १३ गावांचा पाणी पुरवठा बंद असल्याची माहिती दिली.
पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सुरू असलेल्या कामांसाठी डेडलाईन देण्यात आली होती. १४ गावांमध्ये सव्वा दोन लाखांच्या वर नागरिक राहतात. या भागात मागील ९ दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. पाईप लाईनचे काम युद्ध स्तरावर करण्यात येऊन सोमवार पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा असे सांगितले. ५ दिवसांच्या कामाला ९ दिवसांपेक्षा अधिक कालावधी झाल्याबद्दल पालकमंत्री भोयर यांनी नाराजी व्यक्त केली. पाईप लाईन टाकल्यानंतर ज्या तांत्रिक अडचणी आल्या त्या तातडीने दुरूस्त करण्यात यावे, सदर काम युद्धस्तरावर करण्याचे निर्देश दिले. १४ गावांना एकाचवेळी पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याने या बाबतचे नियोजन करावे तसेच काही भागात टँकरने पाणी पुरवठा करावा, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होता कामा नये, असे ही ते म्हणाले.
उद्या होळीचा सण असल्याने शक्य असेल त्या भागात सकाळीचे पाणी पुरवठा करावा, असे ही त्यांनी स्पष्ट केली. बैठकीत संबंधित गावांच्या सरपंच व लोकप्रतिनिधींनी देखील सूचना केल्या बैठकीला पिपरीचे माजी सरपंच अजय गौळकार, सातोडाचे सरपंच गौश्राव गावंडे, सालोडचे उपसरपंच आशिष कुचेवार, उमरीचे सचिन खोसे, वरूडच्या सरपंच सुनिता ठवळे, बोरगांवचे माजी सरपंच संतोष सेलुकर, म्हसाळाचे संदेश किटे, अजय जानवे, पृथ्वी शिंदे, नितीन डफरे आदी उपस्थित होते.