पालकमंत्र्यांच्याहस्ते पीएम विश्वकर्मा लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, टूलकिट व धनादेश वितरण
वर्धा (जिमाका) : पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला प्रोत्साहन देऊन त्यांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून पाण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली. या योजनेचा लाभ घेणाऱ्या कारागिरांनी प्रशिक्करणातून मिळालेले कौशल्य, टूलकिट तसेच कर्जाच्या सुविधेचा उपयोग करून आपला व्यवसाय उभा करावा आणि जीवनमान उंचावावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित पीएम विश्वकर्मा लाभार्थी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक वैभव लहाने, खादी ग्रामोद्योग अधिकारी सरिता राऊत यांच्यासह पीएम विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. सुतार, चांभार, कुंभार, लोहार, सोनार, बेलदार, शिंपी, कोळी, न्हावी, बुरड यांसारख्या पारंपरिक व्यवसायांमधून समाजाची गरज पूर्ण करणाऱ्या कारागिरांच्या कौशल्याला नव्या काळात बळ देण्याचे काम पीएम विश्वकर्मा योजनेतून होत आहे.
शिक्षणाच्या वाढत्या संधीमुळे पारंपरिक व्यवसायांपासून नवीन पिढी दूर जात असली तरी या व्यवसायांना आधुनिक साधने, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत मिळाल्यास ते पुन्हा सक्षम होऊ शकतात, असे डॉ. भोयर यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना विशेष महत्त्वाची असल्याचे सांगताना डॉ.भोयर म्हणाले की, २०२३ मध्ये या योजनेच्या शुभारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः वर्धा जिल्ह्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील कारागीरांनी या योजनेचा योग्य पद्धतीने लाभ घेऊन पारंपरिक कौशल्याला व्यवसायाची जोड द्यावी. प्रशिक्षण केवळ औपचारिकता न राहता त्याचा व्यवसाय वृद्धीसाठी वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उमेदेच्या माध्यमातून महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची अॅमेझॉनसारख्या ई-कॉमर्स मंचावर नोंदणी झाली. लाभार्थ्याची निवड करताना त्यांना योजनेची खरोखर गरज आहे का, याची प्रशासनाने खातरजमा करावी. प्रशिक्षण केंद्रांना भेटी देऊन प्रशिक्षणाचा दर्जा व उपस्थिती तपासावी तसेच लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी लाभार्थ्यांनी पीएम विश्वकर्मा योजनेतून मिळालेले प्रशिक्षण व टूलकिट यांचा उपयोग स्वयंरोजगारासाठी करावा, तसेच बँकेमार्फत मंजूर झालेल्या कर्जाचा उपयोग व्यवसाय विस्तारासाठी करावा, असे आवाहन केले. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना टूलकिट, प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र तसेच बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेल्या कर्जाचे धनादेश वितरित करण्यात आले.