अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचे सावट

‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करीत शासनाने एकरी ५० हजार रुपये मदत मंजूर करण्याची माजी आमदार प्रा. राजु तिमांडे यांनी केली मागणी

हिंगणघाट : खरिपाच्या हंगामात एल निनोचे प्रभावामुळे पावसाच्या सुरू असलेल्या अविरत खंडामुळे दुष्काळाचे सावट निर्माण झाल्याने शासनाने कोरडा दुष्काळ जाहीर करीत शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी(रेल्वे) विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचसह राज्याच्या उपमुख्यमंत्री ना. सुनेत्राताई पवार तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचकडे केली आहे.

यावेळी विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच एल निनो च्या प्रभावामुळे कोरड्या दुष्काळाचे सावट निर्माण असून शासनातर्फे कोरडा दुष्काळ जाहीर करीत दुष्काळी उपाय योजना मंजूर करण्याची मागणी ही त्यांनी यावेळी केली आहे.

खरिपाच्या हंगामात जूनच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. पावसाच्या लपंडावामुळे व अविरत खंडामुळे जुलै महिन्यात पेरणी केलेली पिके उगवलीच नाही. त्यामुळे सर्वसाधारण शेतकऱ्यांना दुबार,तिबार पेरणीचा सामना करावा लागला, कापसाच्या पिकाची लागवड पावसाच्या खंडामुळे यशस्वी झाली नाही तुरीच्या पेरणीही शेतकऱ्यांना वारंवार करावी लागली, काही ठिकाणी अनेक कंपन्यांच्या बियाण्याची उगवण शक्ती कमी असल्यामुळे रोपे निघालीच नाही.

या ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला अल्प प्रमाणात पाऊस आल्यानंतर पुढे पुन्हा २० दिवस पर्यंत पाऊस न आल्याने पिके करपल्या गेली, ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा ५० ते ५५ टक्के पाऊस कमी पडला, सप्टेंबर महिन्यात सुद्धा हीच परिस्थिती राहिल्यामुळे पठारी व मुरमाड जमिनीवरील पिके शेवटल्या घटका मोजत आहे. वर्धा जिल्ह्यातील ७० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची बेडवर लागवड केली असून अर्धा ते पाऊण फूट उंची जमिनीच्या वर लागवड केल्यामुळे पिकाला पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे याशिवाय शेतकऱ्यांना स्वतःची पिके वाचविण्यासाठी २४ तास विधुत पुरवठा करण्याची ही गरज आहे, शेतीसिंचनाकरिता ही सोय आवश्यक आहे.

जिल्ह्यातील तसेच हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील ‘आजन्सरा बॅरेज’ या धरणाला पुरेसा निधी अजूनही उपलब्ध झाला नाही. पावसाळा सुरू झाल्यानंतर तीन महिने उलटून गेले असतानाही पुरेसा पाऊस झाला नाही, अपुऱ्या पावसामुळे कापूस तूर सोयाबीन,ज्वारी,मका इत्यादी सर्व पिके धोक्यात आलेली आहे, विहिरीच्या पाणी पातळीतही घट निर्माण झाली, या सर्व प्रकारामुळे शेतकरी हैराण झाला असून यापूर्वीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांसमोर यंदाचा उत्पादन खर्चसुद्धा भरून निघणार नसल्याचे आवाहन निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *