लहान आर्वीतील खानजोडे यांच्या घरचा आगळावेगळा देखावा
आष्टी (शहीद) : आष्टी तालुक्यात गणेशोत्सवाची धूम सुरू असतानाच लहान आर्वी येथील पंजाबराव खानजोडे यांच्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाच्या आगळ्यावेगळ्या प्रतीकृतीच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. ग्रामीण जीवनशैली, शेती आणि वारकरी परंपरेचा सुंदर संगम या देखाव्यातून साकारण्यात आला आहे.
या देखाव्यात ”गणपती घरून शेतात निघाला…मध्येच वाटेत वारकरी दिंडी भेटली” या संकल्पनेपासून सुरुवात करण्यात आली आहे. घरातून बाहेर पडलेला गणराय पुढे बैलगांडीतून शेताकडे जाताना दाखवण्यात आला आहे. पारंपरिक शेती आणि बैलगाडीचे ग्रामीण जीवनाशी असलेले नाते या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
गणपती बाप्पा बैलगांडीतून रस्त्याने शेताकडे जात असताना वाटेत त्याची वारकऱ्यांशी भेट होत असल्याचे दृश्यही साकारण्यात आले आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करणाऱ्या वारकऱ्यांमुळे देखाव्याला भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले आहे.
विशेष म्हणजे पुढे धुरकराच्या मागे गणपती बाप्पा बसलेला असल्याचे दृश्य साकारण्यात आले असून, शेतकरी आणि शेतीच्या दैनंदिन जीवनाशी गणरायाचे असलेले नाते यातून अधोरेखित करण्यात आले आहे. ग्रामीण संस्कृती, शेतकऱ्यांचे जीवन आणि भक्तीभाव यांचा सुरेख मेळ या देखाव्यात पाहायला मिळत आहे.
खानजोडे कुटुंबीयांनी कल्पकतेने साकारलेल्या या देखाव्याची परिसरात चर्चा होत असून, गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. पारंपरिक ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविण्याच्या या उपक्रमातून नव्या पिढीलाही गावाकडील संस्कृती आणि शेतीशी जोडण्याचा सुंदर संदेश मिळत आहे.लहान आर्वी येथील पंजाबराव खानजोडे यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते सुरेश तडस,भुषण होले,सरपंच सुनिल साबळे यांनी भेट देऊन खानजोडे परिवाराचे कौतुक केले. यावेळी पंजाबराव खानजोडे, निलेश खानजोडे, मनोहर खानजोडे,आकाश खानजोडे, सौ.सिंधुताई खानजोडे, सौ.संजीवनीताई खानजोडे ,कु.जिबिका खानजोडे आदी परिवारातील सदस्य उपस्थित होते.