निष्ठा आणि दृढ संकल्पामुळे हिंदीची प्रगती होईल : प्रो. सूर्यप्रसाद दीक्षित
वर्धा : महात्मा गांधी अंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात हिंदी दिनानिमित्त ‘हिंदीची संवैधानिक स्थिती आणि सध्याची तांत्रिक आव्हाने’ या विषयावर सोमवारी आयोजित विशेष व्याख्यानात लखनऊ विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे निवृत्त विभागप्रमुख प्रो. सूर्यप्रसाद दीक्षित म्हणाले की, अंतःकरणातील निष्ठा आणि दृढ संकल्प यांच्या बळावरच हिंदी भाषेच्या प्रगतीला अधिक गती देता येईल. विद्यापीठाच्या हिंदी साहित्य विभागातर्फे महादेवी वर्मा सभागृहात कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
ऑनलाइन माध्यमातून व्याख्यान देताना प्रो. दीक्षित म्हणाले की, हिंदी ही सृजन, व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रशासनाची भाषा आहे. १४ सप्टेंबर १९५० रोजी नियमावली तयार झाल्यानंतर हिंदीला पंधरा वर्षांत सर्वांगसुंदर आणि सक्षम भाषा बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यासाठी आयोग आणि विविध कार्यालयांची स्थापना करण्यात आली; मात्र अपेक्षित परिणाम साध्य झाले नाहीत. बदलत्या तांत्रिक युगात संबंधित अधिनियमांच्या तरतुदींमध्ये बदल करणे आवश्यक आहे. युनिकोडमुळे हिंदीच्या विकासाला मोठी मदत झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
सत्यनिष्ठेने हिंदीचा प्रसार आणि विकास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भाषांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याची आवश्यकता अधोरेखित करताना ते म्हणाले की, एखादी भाषा नष्ट होणे म्हणजे एका संस्कृतीचा नाश करणे होय. त्यामुळे भाषांचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय असणे आवश्यक आहे. त्यांनी हिंदीसमोरील विविध तांत्रिक आव्हानांवरही प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा म्हणाल्या की, इंग्रजीबद्दलचा अतिरेक मोह सोडून आपल्या मनात विश्वास, आत्मविश्वास आणि स्वाभिमान निर्माण करून हिंदीला आधुनिक तांत्रिक युगात अधिक सक्षम बनविण्याची गरज आहे. भाषा जितनी सोपी असेल तितकी तिची प्रगती अधिक वेगाने होते, असे त्या म्हणाल्या. दैनंदिन जीवनात प्रचलित असलेल्या शब्दांचा वापर वाढविण्याचे त्यांनी आवाहन केले. अंतर्गतनिष्ठा आणि दृढसंकल्प यांच्या बळावरच भाषेची खरी प्रगती शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारी कार्यालयांमध्ये मौलिक कामकाज हिंदीतून करून भाषाला प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागतपर भाषण हिंदी साहित्य विभागाच्या अध्यक्षा प्रो. प्रीती सागर यांनी केले. त्या म्हणाल्या की, आमचे विद्यापीठ हिंदीच्या जागतिक प्रचार-प्रसारासाठी कटिबद्ध आहे. हिंदीला जागतिक स्तरावर अधिक व्यापक स्थान मिळवून देण्याची जबाबदारीने कार्य करण्याची गरज आहे.
कार्यक्रमाचे संचालन हिंदी साहित्य विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. सुनील कुमार यांनी केले, तर असोसिएट प्रोफेसर डॉ. अशोकनाथ त्रिपाठी यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि कुलगीत गायनाने झाली. यावेळी प्रो. जनार्दन कुमार तिवारी, डॉ. एच. ए. हुनगुंद, डॉ. रामानुज अस्थाना, डॉ. रुपेश कुमार सिंह, डॉ. शैलेश मरजी कदम, डॉ. कोमल कुमार परदेशी, डॉ. रविकुमार, डॉ. अमित विश्वास, बी. एस. मिरगे यांच्यासह मोठ्या संख्येने शोधार्थी आणि विद्यार्थी उपस्थित होते