पालकमंत्र्यांकडून खासदार अमर काळे यांना पुढील वर्षी डी.पी.सी. चा निधी देण्याचे आश्वासन

प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : सन २०२५-२६ जिल्हा वार्षिक योजनेमधून जिल्ह्यातील विविध योजनेअंतर्गत खासदार अमर काळे यांनी जिल्हाधिकारी व पालक मंत्री यांचेकडे ४२ कोटी रुपयाची विकास कामे करण्यासाठी निधी मागणी प्रस्ताव सादर केले होते. परंतु माहे जुन महिन्यात जिल्हा नियोजन समितीची सभा होऊन खासदार श्री अमर काळे यांनी प्रस्तावित केलेल्या एकाही कामाला पालकमंत्र्यांकडून निधी न मिळाल्याने खासदार श्री. अमर काळे यांनी ही बाब दि. १४ जानेवारी २०२६ ला डी.पी.सी. च्या सभेत बोलून दाखविली व लोकप्रतिनिधी या नात्याने विकास कामे प्रस्तावित करूनही निधी न मिळाल्यामुळे खंत व्यक्त केली. इतकेच नव्हे तर त्यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेल्या कोणत्या लोक प्रतिनिधींच्या किती कामाला निधी वितरीत केला याबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांचेकडे सतत मागीतली.

परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून खासदार श्री अमर काळे यांचे पत्राला कुठलाही प्रतीसाद न मिळाल्याने याबाबत खासदार अमर काळे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. या बाबत जिल्हाधिकारी यांनी मौन राहणे पसंत केले. यानंतर खासदार अमर काळे यांनी मी प्रस्तावित केलेल्या कामांना निधी मंजूर का केला गेला नाही. मी लोकप्रतिनिधी नाही का? किंवा इतर जिल्ह्यातील माझ्या सारख्याच विरोधी पक्षाचे असूनही त्या खासदारांना त्यांचे जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळू शकतो तर याला वर्धा जिल्हाच अपवाद का? असाही प्रश्न खासदार अमर काळे यांनी उपस्थित केला. याबाबततीत पालकमंत्र्यांनी वेळोवेळी दिलेल्या उत्तराने खासदार अमर काळे यांचे समाधान न झाल्याने त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील पुढील विषयावरील चर्चा थोपवून धरली.

जोपर्यंत या विषयावर ठोस उत्तर मिळत नाही तोपर्यंत डीपीसी मध्ये पुढील कुठलाही विषय चर्चेला जाणार नाही अशी ठोस भूमिका खासदार अमर काळे यांनी घेतल्याने व भर सभेतच एका विरोधी पक्षाच्या का होईना पण जिल्ह्याच्या खासदाराला जिल्हा वार्षिक योजनेत त्यांनी सुचविलेल्या कामाला पूर्णपणे डावलल्याने त्यांनी खंत व्यक्त केली व जोपर्यंत पालकमंत्र्या महोदयांकडून ठोस यावर उत्तर मिळत नाही तोपर्यंत ही सभा अशीच थांबून राहील असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे एरवी शांत शांत वाटणारे खासदार अमर काळे मतदार संघातील लोकांनी सुचविलेल्या विकास कामाच्या बाबतीत किती आक्रमक होतात व लोकांच्या हिताचे प्रश्न किती पोटतिडकीने मांडतात याची प्रचिती बैठकीत असलेल्या उपस्थितांना आली.

शेवटी नाईलाजास्तव पालकमंत्र्यांना पुढील वर्षी आपण प्रस्तावित कराल त्या कामांना जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन द्यावे लागले व या आश्वासनानंतरच जिल्हा नियोजन समितीच्या उर्वरित कामकाजास सुरुवात झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *