खासदार अमर काळेचे वनविभागाला पत्र
प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे
वर्धा: आष्टी तालुक्यातील नरसिंगपूर शिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी रामभाऊ उदेभान भोयर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर घटनेची दखल घेत खासदार अमर शरदराव काळे यांनी १९ ऑगस्ट रोजी उपवनसंरक्षक, वर्धा यांना पत्र देत नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
नागपंचमीच्या दिवशी रामभाऊ भोयर हे शेतात पूजा करण्यासाठी गेले असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आष्टी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, अनेक शेतकरी शेतात जाण्यास धास्तावत असल्याचे खासदार काळे यांनी पत्रात नमूद केले आहे. ‘सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा,’ अशी मागणी खासदार अमर काळे यांनी वनविभागाकडे केली आहे. तसेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित गावकऱ्यांना अवगत करावे, अशी सूचनाही त्यांनी पत्रातून केली आहे. दरम्यान, वाघाला जेरबंद करण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चाही काढला असून, वाघाचा बंदोबस्त होईपर्यंत परिसरात २४ तास गस्त ठेवण्याबाबत वनविभागाकडून उपाययोजना करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी खासदारांचा थेट वनविभागाला इशारा; वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी.