वर्धा लोकसभा मतदारसंघातील रेल्वे समस्यांबाबत खासदार अमर काळे यांनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट

वर्धा : लोकसभा मतदारसंघात असलेल्या विविध समस्या संबंधाने खासदार अमर श. काळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली व मतदार संघातील विविध समस्यांबाबत पत्र लिहून त्यावर चर्चा केली. वर्धा जिल्ह्यातील प्रामुख्याने नागपूर ते अमरावती या दरम्यान वर्धा लोकसभा संघात रेल्वे विभागाद्वारे जे अंडरपास करण्यात आले त्यात वर्षभर पाणी साचून राहते. या पाण्याखाली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनधारकांना पाण्याखालील खड्डे दिसत नसल्यामुळे या अंडरपासमध्ये बऱ्याच वेळा अपघात झालेले आहे. पावसाळ्यात तर हे अंडरपास पूर्णत: वाहतुकीसाठी बंद असतात. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.

त्यानंतर पुलगाव ते आर्वी या रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाचे काम बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे रेल्वे फाटक बंद करून ही वाहतूक नदीकाठावरील पुलावरून अरुंद रस्त्याने गेल्या कित्येक वर्षांपासून वळविण्यात आली आहे. यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणीतून मार्ग काढत वाहन चालवावे लागते. हा पूल मंजूर होऊन बरीच वर्षे होऊनही विभागाच्या अनास्थेमुळे हे काम रखडले आहे व याचा फटका पुलगाव-आर्वी या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे खासदार अमर काळे यांनी उड्डाणपुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे किंवा रेल्वे फाटक तरी लोकांसाठी ये-जा करण्याकरिता खुले करावे अशी मागणी केली.

कोरोना काळात नागपूर-बडनेरा तसेच वर्धा-हिंगणघाट या मार्गावर धावणाऱ्या बऱ्याच रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द करण्यात आले होते व काही गाड्या सुद्धा रद्द करण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीत कोरोना संपून तीन ते चार वर्षांचा कालावधी होऊनही थांबे पूर्ववत करण्यात आलेले नाहीत व बंद केलेल्या गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. ही मागणी सुद्धा खासदार अमर काळे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली.

यासोबतच पुलगाव ते आर्वी या नॅरोगेज मार्गावरील बंद पडलेली रेल्वेगाडी पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने आर्वी वासियांना रेल्वे सुविधा आर्वी पर्यंत उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आर्वी – पुलगाव मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करून हा मार्ग पुढे वरुड पर्यंत वाढविण्याबाबतच्या विषयावर सुद्धा चर्चा केली. पुलगाव व वरुड ही रेल्वे लाईन झाल्याने पुलगाव व आमला हे दोन्ही दारुगोळा भांडार रेल्वे मार्गांनी जोडल्या जाणार असून सध्याच्या प्रवासातील दीडशे कि.मी. अंतराचा प्रवास कमी होणार आहे. त्यामुळे ही लाईन लोकांच्या दृष्टीने नाही तर केंद्र सरकारच्या दृष्टीने सुद्धा ब्रॉडगेज करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच अधिविस्कृतीधारक पत्रकारांना रेल्वे सवलत मिळण्याबाबत, नागपूर-भुसावळ-खंडवा ही गाडी सुरु करणे, रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये सुधारणा व वाढ करणे अशा अनेक मागण्यांबाबत खासदार अमर काळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची आज दिनांक १०.०२.२०२६ ला भेट घेऊन मागण्यांसंबंधी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *