प्रतिनिधी / दै. प्रतापगडचे वारे वर्धा : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ‘ऑपरेशन निशाणा’ राबविण्यात आले. १६ जानेवारी ते १८ जानेवारीदरम्यान ४८ तासांच्या कालावधीत जिल्ह्यात राबविलेल्या मोहिमेत तब्बल ८६६ आरोपींची तपासणी करण्यात आली. ८६६ त्यापैकी ६०२ आरोपी मिळून आले तर २४ आरोपींवर कारवाई करण्यात आली.
विशेष मोहिमेत फरार आरोपी, पाहिजे असलेले आरोपी, अजामीनपात्र वॉरंट असलेले आरोपी, कोर्टातून जमीन रद्द झालेले आरोपी, पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अटक करण्याकरिता तसेच रेकॉर्डवरील टॉप २० मधील दारू विक्रेते, शरीराविरुद्धचे, मालमत्तेचे गुन्हे करणारे आरोपी, एनडीपीएस गुन्ह्यातील आरोपी, आर्म ॲक्ट गुन्ह्यातील आरोपी, एमपीडीएममधील सुटलेले आरोपी, मागील दोन वर्षातील हद्दपार आरोपी, हिस्ट्रोशीटर आरोपींना आकस्मिक तपासणी करण्याकरिता ही मोहीम राबविण्यात आली.
मोहीम राबविण्याच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक पोलिस ठाण्यात विशेष पथके तयार करण्यात आली. वर्धा, आर्वी, पुलगाव, हिंगणघाट या चारही उपविभागातील अधिकारी व त्यांची विशेष पथके तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पोलिस अधीक्षक कार्यालयातील ४ विशेष पथके असे वेगवेगळे पथके तयार करण्यात आले. त्यामध्ये ४५ अधिकारी व ४५० अंमलदार समावेिंशत करण्यात आले. पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी याबाबत पोलिस अधीक्षक कार्यालयातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांची उपस्थिती होती.