गिरोली-पुलगाव रस्त्याच्या दुरस्थेविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन

खासदार अमर काळेंनी घेतली तातडीने दखल; डीपीसी मधून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन
प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे

वर्धा : धामणगाव तालुक्यातील गिरोली ते पुलगाव या प्रमुख ग्रामीण मार्गाची गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्ती न झाल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्यावर ठीकठिकाणी मोठेमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, विद्यार्थी, रुग्ण तसेच दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामore जावे लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गिरोली येथील ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा पवित्रा घेत आंदोलन केले.

दरम्यान, मंगरूळ दस्तगीर येथे माजी जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेशराव बाबाराव निमकर यांच्या अंतविधीस उपस्थित राहिल्यानंतर खासदार अमर काळे यांनी तात्काळ गिरोली येथे धाव घेत आंदोलनकर्त्या ग्रामस्थांची भेट घेतली. त्यांनी ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा करून रस्त्याच्या दुरुस्तीची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

यावेळी खासदार अमर काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा करून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. सदर रस्ता ग्रामीण मार्ग असल्याने तो जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दुरुस्तीसाठी प्रस्तावित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात आले.

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किती निधी आवश्यक आहे, याचे तातडीने प्राकल तयार करून त्याची माहिती सादर करावी, असे स्पष्ट निर्देश खासदार काळेयांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. निधीची आवश्यकता निश्चित झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून दे ण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले.

‘पावसाळ्यामुळे सध्या रस्त्याचे कायमस्वरूपी काम करणे शक्य नसले तरी नागरिकांची गैरसोय लक्षात घेता रस्ता तात्पुरता वाहतुकीयोग्य करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी,’ असे निर्देशही खासदार अमर काळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. पावसाळा संपल्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे सततने पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

गिरोली-पुलगाव मार्गावरून शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी, व्यापारी आणि विविध वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे रस्त्याची झालेली दुरवस्था ही केवळ वाहतुकीची समस्या नसून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न बनला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार अमर काळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन तातडीने प्रशासनाला निर्देश दिल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी सरपंच अंकुश डगवार, प्रशांत नाईक, जिया पठाण, सुनील बोरकर, इम्रान पठाण, मोहन राऊत, धीरज तामगाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

गिरोली-पुलगाव रस्त्याचा प्रश्न आता मार्गी लावण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *