एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र वर्ध्यात घ्या:पालकमंत्री डॉ. भोयर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी / दै.प्रतापगडचे वारे वर्धा : राज्य राखीव दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक वर्षाला प्रशिक्षण देण्यात येते. हे प्रशिक्षणाकरिता राज्यात एकमेव केंद्र असून ते दौंड, पुणे येथे आहे. त्याची क्षमता मर्यादित असून सध्याच्या स्थितीत दुसरे केंद्र देणे अपेक्षित आहे. हे केंद्र वर्ध्यात देण्यात यावे, अशी मागणी वर्ध्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र राज्य राखीव दलामध्ये सध्यास्थितीत एकूण २० गटांमध्ये जवळपास २६ हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामधील अंदाजे २,५०० ते ३,००० अधिकारी कर्मचाऱ्याना नियमित वार्षिक प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे. या प्रशिक्षणाकरिता संपूर्ण राज्याकरिता केवळ एकमेव महाराष्ट्र राज्य राखीव बल प्रशिक्षण केंद्र, दौंड, जि. पुणे येथे कार्यरत आहे.

सदर प्रशिक्षण केंद्राची क्षमता ही वर्षाला १५०० अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षित करता येईल एवढी आहे असे समजते. त्यामुळे बलाचा नियोजित वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करणे शक्य होत नाही. तसेच संपूर्ण राज्यातील अधिकारी कर्मचारी यांना त्यांच्या गटातून प्रशिक्षणाकरिता दौंड येथून प्रवास करावा लागत असल्याने त्यात मुख्यतः विदर्भातील मनुष्यबळाचा कालापव्यय होतो. सध्यास्थितीत नागपूर व अमरावती विभागाचा विचार करता, सदर विभागांमध्ये महाराष्ट्र राज्य राखीव बलाचे एकूण ११ गट कार्यरत आहेत. सदर गटांमध्ये एकूण ९,००० ते १०,००० इतके अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत.

या विभागातील सर्व ११ गटांकरिता वर्धा येथे महाराष्ट्र राज्य राखीव बलाचे प्रशिक्षण केंद्र उभारल्यास, सर्व गटांमधील कर्मचाऱ्यांना याच भागामध्ये नियमितपणे प्रशिक्षण देणे शक्य होईल. तसेच त्यामुळे दौंड येथील प्रशिक्षण केंद्रावरील ताण कमी होण्यास मदत होऊन विदर्भ क्षेत्रातील सर्व गटांकरिता नियमित वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम सहजपणे पार पाडणे शक्य होईल. त्यामुळे महाराष्ट्र राज्य राखीव बलाच्या विदर्भ क्षेत्रातील सर्व गटांकरिता प्रशिक्षण केंद्र वर्धा येथे उभारण्याबाबत मान्यता देण्याची मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *