जिल्ह्यातील 6 नगरपरिषद व 4 नगरपंचायतचा नमो उद्याण योजनेत समावेश – पालकमंत्री डॉ पंकज भोयर

वर्धा, दि.१८ (जिमाका) : राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्यावतीने राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात नमो उद्याण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत जिल्ह्यातील सहा नगरपरिषद तसेच चार नगरपंचायतचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक शहरात उद्याण निर्मितीसाठी राज्य सरकारकडून एक कोटी रूपयांचे अनुदान दिल्या जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिली.

सदर निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत दिल्या जाणार आहे. जिल्ह्यातील अ वर्ग दर्जाची वर्धा व हिंगणघाट, ब वर्ग दर्जातील आर्वी, क वर्ग दर्जातील पुलगांव, देवळी, सिंदी रेलवे तसेच समुद्रपूर, सेलू, कारंजा, आष्टी आदी नगरपंचायतचा समावेश आहे. योजनेंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या नमो उद्याणाची विभागीय स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागांतर्गत तीन उद्याणाची निवड करण्यात येणार असून नमो उद्याणाचा प्रथम दर्जाचा मान प्राप्त करणाऱ्या नप व नपं ला 5 कोटी तसेच द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या नप व नपं ला तीन व दोन कोटीचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर करण्यात येणार आहे. नप मार्फत सदर योजनेचे काम होणार आहे.

आता चांगल्या दर्जाच्या उद्यानाची होणार निर्मिती

नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात उद्याणासाठी जागा असताना देखील निधी अभावी उद्याणाचा विकास होत नव्हता. त्यामुळे उद्यानाची जागा भकास झाली होती. काही नगर परिषद व नपं कडून उद्यानाची निर्मिती करण्यात आली. परंतू अपुऱ्या निधीअभावी पूर्ण सुविधा नागरिकांना मिळत नव्हत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या संकल्पनेतून राज्यात नमो उद्याण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत एक कोटी रूपयांचा निधी प्रत्येक नप व नपं ला मिळणार असल्याने या निधीतून सुंदर असे उद्याण प्रत्येक शहराला मिळणार आहे. तथापि, ज्येष्ठ नागरिकांसह बालगोपालांसाठी सुविधा होणार आहे.

प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. राज्य सरकारने नमो उद्याण योजना अंमलात आणली आहे. या योजनेतून नप व नपं क्षेत्रात उत्कृष्ट व सुंदर अशा उद्याणाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी एक कोटी रूपयांचा निधी दिल्या जाणार आहे. नप व नपं ने या निधीचे योग्य नियोजन करून सुंदर असे उद्याण निर्माण करून विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटावावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *