सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुन विनायक यांनी आज सामान्य रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी वानमथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सामण, आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले आदी उपस्थित होते.रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. उपलब्ध मनुष्यबळ आणि साधनांचा योग्य वापर करावा. त्याचबरोबर रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छता आणि रुग्ण व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे, अशाही सूचना डॉ. निपुन विनायक यांनी केल्या.
आरोग्य यंत्रणेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत आरोग्य सेवा अधिक लोकाभिमुख आणि सुलभ करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. निपुन विनायक यांनी सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, रक्तपेढी आणि विशेष युनिट्सची पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर माता व बाल आरोग्य सेवा, लसीकरण कार्यक्रम आणि संसर्गजन्य रोगांच्या तपासणी कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावाही घेतला.