व्हीबीजीरामजी जनजगृती कार्यशाळा व जिल्हास्तरीय पंच संमेलनवर्धा (जिमाका): ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने साध्य करण्यासाठी केंद्र सरकारकने विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अर्थात व्हीबीजीरामजी योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय निश्चित केले असून, हे ध्येय साध्य करण्यासाठी ग्रामीण विकासाला आतापासूनच गती देणे आवश्यक आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने गावाच्या गरजा लक्षात घेऊन विकास आराखडा तयार करावा आणि व्हीबीजीरामजी योजनेचा प्रभावी वापर करून गावांमध्ये आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण कराव्यात, असे आवाहन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) अंतर्गत व्हीबीजीरामजी जनजगृती कार्यशाळा व जिल्हास्तरीय पंच संमेलनाचे आयोजन जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री डॉ. भोयर बोलत होते. यावेळी आमदार सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वानमथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीपती मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे आदी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराून व्हीबीजीरामजी ही महत्वपूर्ण योजना देशभरात सुरू करण्यात आली आहे. पूर्वीच्या रोजगार हमी योजनेच्या तुलनेत या अभियानात अनेक महत्वपूर्ण बदल करण्यात आले असून, रोजगाराची मर्यादा १०० दिवसांवरून वाढवून १२५ दिवस करण्यात आली आहे. ग्रामीण नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देतानाच त्यातून गावांच्या विकासाला चालना देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी विकास आराखडा तयार करून त्यानुसार उपलब्ध योजना व निधीचा योग्य समन्वय साधावा आणि जास्तीत जास्त विकासकामे हाती घ्यावीत, असे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले.
ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार केल्यानंतर त्यामध्ये कोणती कामे घेता येतील, त्यासाठी कोणत्या योजनेतून निधी उपलब्ध होऊ शकतो आणि विविध योजनांचे अभिसरण करून मोठे प्रकल्प कशा पद्धतीने पूर्ण करता येतील, याचे नियोजन करणे आवश्यक आहे. उपलब्ध निधीचे योग्य अभिसरण केल्यास ग्रामीण भागातील प्रलंबित विकासकामांना मोठ्या प्रमाणावर गती देता येईल. विविध योजनांचा समन्वय साधून एखादा प्रकल्प अधिक व्यापक स्वरूपात राबविता येतो. त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा तसेच इतर आवश्यक विकासकामांसाठी उपलब्ध योजनांचा जास्तीत जास्त उपयोग करावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी आमदार सुमित वानखेडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रामपंचायतींनी व्हीबीजीरामजी या योजनेच्या माध्यमातून अभिसरणाद्वारे विकासाची विविध कामे घ्यावीत, असे म्हणाले. कार्यशाळेत व्हीबीजीरामजी अभियानातील विविध तरतुदी, करण्यात आलेले बदल, अंमलबजावणीची पद्धत, ग्रामपंचायत विकास आराखडा तसेच विविध योजनांच्या अभिसरणाबाबत माहिती देण्यात आली. लोकप्रतिनिधी व उपस्थित सरपंचांच्या विविध प्रश्नांचे आणि शंकांचे यावेळी निरसन करण्यात आले. कार्यशाळेला जिल्ह्यातील सरपंच तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.